विजयी पुनरागमनाचेच झिदान यांना समाधान

वृत्तसंस्था
Monday, 18 March 2019

झिनेदिन झिदानने त्याच्या रेयाल माद्रिद मार्गदर्शक पदाच्या दुसऱ्या डावाच्या खेळीस यशस्वी सुरवात केली खरी, पण त्याच वेळी ऍटलेटिको माद्रिदही पराजित झाल्याने ला लिगामधील रेयालचे कडवे प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचे विजेतेपद जवळपास निश्‍चित झाले.

माद्रिद : झिनेदिन झिदानने त्याच्या रेयाल माद्रिद मार्गदर्शक पदाच्या दुसऱ्या डावाच्या खेळीस यशस्वी सुरवात केली खरी, पण त्याच वेळी ऍटलेटिको माद्रिदही पराजित झाल्याने ला लिगामधील रेयालचे कडवे प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचे विजेतेपद जवळपास निश्‍चित झाले.
इस्को आणि गेराथ बेल यांनी प्रत्येकी एक गोल करीत रेयालला सेल्टा व्हिगोविरुद्ध 2-0 विजयी केले. रेयालच्या या लढतीच्या वेळी क्वचितच संघावर तणाव जाणवत होता. ही मोसमपूर्व लढत आहे असेच वाटत होते. ऍटलेटिको माद्रिदला ऍथलेटिक बिल्बाओविरुद्ध 0-2 हार पत्करावी लागली. आता बार्सिलोना रेयाल बेटीसला हरवून जेतेपदाच्या शर्यतीत विजयी आघाडी घेऊ शकतील.

झिदान यांनी आपण आल्याचे दाखवण्यासाठी आतापर्यंत सतत राखीव खेळाडूच उतरलेल्या इस्कोला सुरवातीपासून उतरवले. तसेच यापूर्वीच्या मार्गदर्शकांनी कायम राखीव ठेवलेल्या बेलला सुरवातीपासून संधी दिली. दोघांनीही गोल केले; मात्र झिदान यांनी माझी मदार प्रत्येकावरच असेल. मी कोणालाही कमी लेखणार नाही असे सांगितले. रेयालने या विजयासह घरच्या मैदानातील सलग चार पराभवांनंतर विजय मिळवला. आता रेयाल आणि ऍटलेटिको यांच्यात दोनच गुणांचा फरक आहे.

सिटी उपांत्य फेरीत
लंडन : मॅंचेस्टर सिटीने विश्रांतीच्या दोन गोलच्या पिछाडीनंतर स्वेन्सी सिटीचा 3-2 पाडाव केला आणि एफए कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेतील मॅंचेस्टर युनायटेडचे आव्हान आटोपले. हंगामी मार्गदर्शक ओले गनर यांचा हा सलग दुसरा पराभव. व्होल्व्हजने युनायटेडला 2-1 हरवले. सिटीच्या सर्जिओ ऍग्यूएरा याने केलेला निर्णायक गोल वादग्रस्त ठरला. या वेळी ऍग्यूएरा हा काहीसा ऑफसाईड होता; तर त्यापूर्वी सिटीला पेनल्टी देण्याचा निर्णयही चुकीचा होता.

रोमाची सनसनाटी हार
रोमाला स्पालविरुद्ध 1-2 हार पत्करावी लागली. या पराभवामुळे रोमा इटालियन साखळीत पाचव्या क्रमांकावर गेले. क्‍लॉडिओ रानिएरी यांनी नुकतीच रोमाची सूत्रे हाती घेतली आहेत. पदार्पणाच्या दुसऱ्या सामन्यात त्यांना पहिली हार पत्करावी लागली; मात्र त्यांनी अजूनही आम्हाला चॅंपियन्स लीग पात्रतेची आशा असल्याचे सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या