रेयाल माद्रिदचे पॅकअप, झिझोऊकडून हवा बॅकअप

मुकुंद पोतदार
Tuesday, 12 March 2019

स्पॅनीश लिगचा अर्थात ला लीगामधील अग्रगण्य क्लब रेयाल माद्रिदने UEFA चँपीयन्स लीगमधील गच्छंतीसह इतर प्रमुख स्पर्धांतील धक्कादायक अपयशी मालिकेनंतर झिनेदीन झिदानला प्रशिक्षकपदाची धुरा पुन्हा पेलण्यासाठी पाचारण केले आहे

स्पॅनीश लिगचा अर्थात ला लीगामधील अग्रगण्य क्लब रेयाल माद्रिदने UEFA चँपीयन्स लीगमधील गच्छंतीसह इतर प्रमुख स्पर्धांतील धक्कादायक अपयशी मालिकेनंतर झिनेदीन झिदानला प्रशिक्षकपदाची धुरा पुन्हा पेलण्यासाठी पाचारण केले आहे. रेयाल माद्रिदच्या मुख्य संघाची (first team) गाडी नुसतीच रुळावरून घसलेली नसून एकूणच घडी विस्कटली आहे. झिझोऊ या टोपणनावाने लोकप्रिय असलेल्या फ्रान्सच्या या चँपीयन फुटबॉलपटूने रेयाल माद्रिदचा प्रशिक्षक म्हणूनही त्याच तोडीची कामगिरी केली. पहिली इनिंग यशस्वी ठरविल्यानंतर त्याने प्रशिक्षकपद सोडले होते. तेव्हा हा गुडबाय नसून नजिकच्या काळात पुन्हा भेट घेऊ अशी भावना त्याने व्यक्त केली होती, पण त्यानंतर जेमतेम दहा महिन्यांच्या आत दोन प्रशिक्षक तडकाफडकी हटवून झिदानला पाचारण करण्याची वेळ रेयाल माद्रिदवर येईल असे कुणाला वाटले नव्हते.

झिदान गेल्यानंतर मात्र रेयाल माद्रिद आणि त्यांचे प्रशिक्षक याच्याशी संबंधित ग्रह बिघडले आणि संघाच्या कामगिरीला उतरती कळा लागली. ज्युलेन लोपेतेगुई यांना रेयाल माद्रिदबरोबरील करार जाहीर करण्याची घाई नडली. रशियातील फिफा वर्ल्ड कपच्या किक-ऑफच्या काऊंटडाऊनचा मुहुर्त त्यांनी निवडला. त्यामुळे त्यांची स्पेनकडून तडक हकालपट्टी करण्यात आली. रेयाल माद्रिदसाठी हा जणू काही अपशकूनच ठरला. याच लोपेतेगुई यांनी रेयाल माद्रिदचे प्रशिक्षक म्हणूनही अपेक्षाभंग केला. त्यामुळे कॅस्तीला या राखीव संघाचे (Ctilla) प्रशिक्षक सँतीयागो सोलारी यांच्याकडे हे पद सोपविण्यात आले, पण त्यांनी आणखी घोर निराशा केली. UEFA चँपीयन्स लिगमधून गारद होण्याची वेळ क्लबवर आली.

नेदरलँड््सच्या अॅजॅक्सविरुद्ध घरच्या मैदानावर 1-4 असा पराभव होणे रेयाल माद्रिदच्या लौकीकाला काळीमा फासणारे ठरले. अॅग्रीगेटवरील 3-5 अशा पराभवानंतर सोलारी यांची घटका भरल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर क्लबला कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोनाविरुद्ध सलग दोन पराभव पत्करावे लागले. एल क्लासिकोमध्ये 0-1, तर कोपा डेल रेय स्पर्धेत 1-4 असे धक्के बसले.

सात दिवसांच्या अंतराने असे तीन पराभव घरच्या मैदानावर रेयाल माद्रिदला पत्करावे लागले, तेव्हाच हे अपयश केवळ मैदानावरील कामगिरीशी संबंधित नव्हते अशी चर्चा सुरु झाली. त्यातच रेयाल माद्रिद क्लबचे अध्यक्ष फ्लोरेंटीनो लोपेझ यांचा ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार सर्जिओ रॅमॉस याच्यासह प्रमुख खेळाडूंशी खटका उडाला. रॅमॉसची हकालपट्टी करण्याचा इशारा त्यांनी दिला, तर करारानुसार मला देणे लागणारी रक्कम चुकती करा, मी निघतो असे प्रत्यूत्तर त्यांना मिळाल्याची चर्चा आहे.
1955-56 मध्ये युरोपीय स्पर्धेला (European Cup) प्रारंभ झाल्यानंतर रेयाल माद्रिदने पहिली सलग पाच वर्षे जेतेपद मिळविले होते. सर्वाधिक 13 जेतेपदांचा विक्रम याच क्लबच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एसी मिलानच्या खात्यात सात करंडक जमा आहेत. याचा अर्थ हा आकडा निम्यापेक्षा कमी आहे. रेयाल माद्रिदने गेल्या तीन मोसमांत जेतेपद मिळवून पुन्हा यशोमालिका सुरु केली होती. ख्रिस्तीयानो रोनाल्डो नसला तरी रेयाल माद्रिद इतक्या लवकर गारद होईल यावर त्यांच्या चाहत्यांचा विश्वास बसणे कठिण होते.

अडीच मोसमांच्या कालावधीत झिदानचे यश डोळे दिपविणारे होते. मुळात खेळाडू म्हणून इतके विलक्षण यश मिळविलेल्या फुटबॉलपटूंना प्रशिक्षक म्हणूनही तसाच प्रभाव पाडता आल्याची उदाहरणे आंतरराष्ट्रीय तसेच व्यावसायिक क्लबच्या इतिहासात फार कमी आहेत. यासाठी अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोनाचे उदाहरण पुरेसे ठरते. झिदानला  2017 मध्ये पुरुष विभागातील सर्वोत्तम फिफा प्रशिक्षक हा पुरस्कार मिळाला. मे 2018 मध्ये झिदानने आपली इनिंग थांबवायचे ठरविले.

त्यानंतर त्याच्या जागी येणाऱ्या वारसदारांसमोर जबरदस्त आव्हान होते. लोपेतेगुई यांच्याकडून रेयाल माद्रिदची परंपरा वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा होती, पण आक्रित घडले. मग सोलारी यांची नियुक्ती तशी तात्पुरत्या स्वरुपाची होती. मुळात इतक्या अपयशानंतर सोलारी यांच्याकडे या पातळीवरील यशासाठी लागणारी दुरदृष्टी, निर्णयक्षमता नसल्याचेच स्पष्ट झाले. स्पेनमधील Marca या वृत्तपत्राने रेयाल माद्रिदच्या पराभवांचा उल्लेख करताना शतकातील अपयश असा शब्दप्रयोग केला.

या पार्श्वभूमीवर झिदानची पहिली इनिंग यशस्वी ठरत असताना ती आणखी प्रदिर्घ ठरावी अशी रेयाल माद्रिच्याच चाहत्यांचीच नव्हे तर जगातील अनेक फुटबॉलप्रेमींची इच्छा होती. झिदानही दोन वर्षे राखीव संघाचा (Castilla) प्रशिक्षक होता. 2001 ते 2006 अशा कालावधीत खेळाडू म्हणून रेयाल माद्रिदचे प्रतिनिधीत्व त्याने केले होते. साहजिकच क्लबशी ऋणानुबंध जुळला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये झिदानने 2022 पर्यंत प्रशिक्षक राहण्यास होकार दिला आहे. 

रोनाल्डोची उणीव भरून काढण्याचे आव्हान
जेमतेम दहा महिन्यांच्या आत झिदानने कमबॅक केले असले तरी त्याचा मार्ग सोपा नाही. यातील मुख्य फरक आहे तो ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा. रोनाल्डोने युव्हेंट््सशी विक्रमी करार केल्यानंतर रेयाल माद्रिदमध्ये पोकळी निर्माण झाली. ती भरून काढणे झिदानला क्रमप्राप्त असेल. इतरही स्ट्रायकरच्या फॉर्मला ओहोटी लागली आहे. ला लिगामध्ये करीम बेन्झेमा हाच डबल फिगरमध्ये गोल करू शकला आहे. गॅरेथ बेल आणि सर्जिओ रॅमॉस यांना सर्व स्पर्धांत मिळून हा आकडा जेमतेम गाठता आला आहे. मुख्य म्हणजे रोनाल्डोनंतर या तीनपैकी एकही खेळाडू क्लबसाठी भविष्याचा सक्षम पर्याय ठरत नाही. कर्णधार रॅमॉस याचे क्लबचे अध्यक्ष फ्लोरेन्टीनो पेरेझ यांच्याशी बिनसले आहे, तर बेलचे चाहत्यांशीच बिनसले आहे. क्लबच्याच समर्थकांनी त्याची हुर्यो उडविण्यापर्यंत परिस्थिती टोकाला गेली आहे. बेलला क्लबने करारानुसार कायम ठेवावे का याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी बेलच्या बाजूने केवळ आठ टक्के कौल आला. तीन लाखहून जास्त चाहत्यांनी या सर्वेक्षणास प्रतिसाद दिला होता. याच बेलशी झिदानचेही फारसे पटत नाही.

सर्वाधिकार मिळणार
झिदानने पेरेझ यांना उन्हाळी मोसमात अनेक योजना सुचविल्या होत्या. त्यावेळी पेरेझ त्यास फारसे इच्छूक नव्हते. आता यातील बहुताश योजना तडीस नेल्या जातील. झिदान हा केवळ मुख्य संघाचीच नव्हे तर एकूणच निर्णयप्रक्रियेची दिशा ठरवेल. झिदान संघाची पुनर्बांधणी करणार हे स्पष्ट आहे. खेळाडू म्हणून झिदान फ्रान्ससाठी निष्ठेने खेळला आणि फ्रेंच फुटबॉल क्रांती घडविली. तो झिदान रेयाल माद्रिदच्या दुसऱ्या इनिंगचे आव्हान कसे पेलणार याची उत्सुकता आहे.

झिदानची पहिली इनिंग : स्तिमीत करणारी आकडेवारी
- रेयाल माद्रिद सलग तीन वेळा UEFA चँपीयन्स लिगमध्ये विजेते (2016 ते 18)
- त्याआधी अशी कामगिरी बायर्न म्युनिककडून (1973 ते 75)
- एकूण 149 सामन्यांत केवळ 16 पराभव
- सामने-करंडक सरासरी 16 सामन्यांची
- चँपीयन्स लिगच्या हॅट्ट्रीकशिवाय 2 FIFA क्लब वर्ल्ड कप, 2 UEFA सुपर कप, 1 ला लीगा जेतेपद, 1 स्पॅनीश सुपर कप जेतेपद


​ ​

संबंधित बातम्या