षटकार किंग माफी मागणार का? या कारणामुळे नेटकरी युवीवर संतापले

टीम ई-सकाळ
Tuesday, 2 June 2020

युवराज सिंग माफी मांगो' हा ट्रेंड दिसत असून षटकाराच्या बादशहाने माफी मागावी अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मासोबतच्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये युवीने जातीवाचक शब्द वापरल्यावरुन नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. 

मुंबई : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सोमवारी रात्रीपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऐककाळी आपल्या भात्यातील फटकेबाजीने क्रिकेट चाहत्यांना भारावून सोडण्याच्या शैलीमुळे चर्चेत असणाऱ्या युवराज यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होताना दिसतोय. सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी मांगो' हा ट्रेंड दिसत असून षटकाराच्या बादशहाने माफी मागावी अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मासोबतच्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये युवीने जातीवाचक शब्द वापरल्यावरुन नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. रोहितसोबतच्या संवादाचा युवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता #युवराज_सिंग_माफी_मांगो ट्रेंडच्या माध्यमातून नेटकरी युवीवर संताप व्यक्त करत आहेत.  

खेलरत्न पुरस्कार नामांकन मिळाल्यावर हिटमॅन रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी लॉकडाउनच्या काळात इन्ट्राग्रामच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला होता. या दोघांनी क्रिकेट, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच वयक्तिक जीवनातील अनुभव यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. या दोघांचा संवाद रंगला असताना भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल कमेंट करत होते. त्यांच्या कमेंटसंदर्भात बोलताना युवीने जातीवाचक शब्दाचा वापर केला. युजवेंद्र चहलची फिरकी घेण्यासाठी युवराजने वापरलेला शब्द आता त्याला चांगलाच महागात पडताना दिसत आहे.  

संगकारा म्हणाला, गोंधळ धोनीमुळे झाला नव्हता तर...

वयाच्या 18 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या युवराज सिंगने  2007 टी-20 विश्वचषक स्पर्धा आणि 2011 वनडे विश्वचषक स्पर्धेतील विजयात भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली होती. क्रिकेटच्या मैदानातील फटकेबाजीप्रमाणे तो शाब्दिक कोटी करुन आपल्या सहकाऱ्यांची गंमत करण्याबाबतही चांगलाच लोकप्रिय आहे. मात्र यावेळी युजवेंद्र चहलची मजाक करण्याच्या नादात तोच फसल्याचे चित्र दिसते आहे. युवराज सिंग यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

या स्पर्धेनं याठिकाणी रंगणार 'फॉर्म्युला वन रेस'चा थरार, पण...

तब्बल 17 वर्ष भारतीय संघांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युवीने मागील वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 304 वनडे सामन्यात त्याने 8701 धावा केल्या असून 111 बळी घेतले आहेत. 58 टी-20 सामन्यात 136.66 च्या स्ट्राइक रेटने त्याने 1177 धावा केल्या आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या