बॉलिवूडमध्ये बॅटिंग करणारे हे क्रिकेटर तुम्हाला आठवतायत का?

टीम ई-सकाळ
Friday, 26 June 2020

क्रिकेटमधील अनेक मंडळी बॉलिवूडच्या कनेक्शनमुळे चर्चेचा विषय ठरली. काही क्रिकेटर्संनी तर बॉलिवूडच्या मैदानात आपल्या अभिनयाची झलक दाखवण्याचाही प्रयत्न केलाय. नजर टाकूयात अशा क्रिकेटर्सवर जे चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकले होते. 

क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यात कमालीचा समतोल पाहायला मिळतो. क्रिकेटच्या मैदानात आपल्या तुफानी खेळीनं भल्या भल्यांना पुरुन उरणारे अनेक क्रिकेटर्स बॉलिवूडच्या अभिनेत्रींसमोर क्लिन बोल्ड झाल्याचे किस्से नवे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्रीसह काही महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या हार्दिक पांड्यापासून ते कर्णधार विराट कोहलीपर्यंत अनेक क्रिकेटर्सची बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी विकेट घेतली आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन, अष्टपैलू युवराज सिंग यासारखी क्रिकेटमधील अनेक मंडळी बॉलिवूडच्या कनेक्शनमुळे चर्चेचा विषय ठरली. काही क्रिकेटर्संनी तर बॉलिवूडच्या मैदानात आपल्या अभिनयाची झलक दाखवण्याचाही प्रयत्न केलाय. नजर टाकूयात अशा क्रिकेटर्सवर जे चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकले होते. 

ब्रेट ली (अन इंडियन)

क्रिकेटच्या मैदानात आपल्या लयबद्ध गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचे कंबरडे मोडणारा ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली हा गिटार वादनाचा प्रेमी होता. काही प्रसिद्ध बॅण्डमध्ये त्याने आपल्यातील कला गुणांना वावही दिला. 2006 मध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या अल्बममधून बॉलिवूडकरांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर ब्रेटलीने चक्क हिंदी चित्रपटात काम केले. अन इंडियन नावाच्या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. 2015 मध्ये त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.   

#क्रिकेट_डायरी : या पाच भारतीय फलंदाजांनी पहिल्या ODI शतकासाठी खूप वेळ घेतला!​

मोहसीन खान, (साथी)

पाकिस्तानचा सलामीवीर मोहसीन खान याने देखील बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत पाकिस्तानकडून 48 कसोटी सामने खेळलेल्या मोहसीन खान यांनी 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. मोहसीन खान यांनी 1983 मध्ये रिना रॉय या भारतीय अभिनेत्रीशी विवाह केला होता. 1991 मध्ये  महेश भट्ट दिग्दर्शित 'साथी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनुपम खेर आणि परेश रावल या तगड्या कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटात मोहसीन खान यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.  

आयपीएलवरुन बीसीसीआय-पीसीबी आमने सामने
 

अजय जडेजा (खेल) 

नव्वदीच्या दशकात मॅच फिक्सिंगप्रकरणात अडकलेल्यानंतर क्रिकेटपासून कायमचा दूर गेलेला अजय जडेजा आणि बॉलिवूडमधील कनेक्शन हा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिला. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर हसतमुख जडेजाने चित्रपटात काम केल्याचे पाहायला मिळाले. सनी देओल आणि सुनील शेट्टी या बॉलिवूडमधील प्रमुख अभिनेत्यांसोबत त्याने खेल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. 

विनोद कांबळी (अनर्थ)

सचिनपेक्षा स्फोटक फलंदाजीची क्षमता असलेला डावखुरा फलंदाज विनोद कांबळी आपल्यातील क्षमतेचा क्रिकेटमध्ये म्हणावा तेवढा फायदा घेऊ शकला नाही. कारकिर्दीला बहर आणण्याच्या  क्षणी इतर गोष्टींवर लक्षविचलित झाल्यामुळे कांबळीचं करियर संपलं, अशी क्रिकेट वर्तुळात नेहमीच चर्चा होते. अजूनही छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या कांबळीनेही चित्रपटात काम केले आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अनर्थ' नावाच्या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर झळकला होता. पण त्यानंतर त्याचा बॉलिवूडमधील प्रवासही आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रिकेटसारखाच फ्लॉप ठरला.  

संदीप पाटील आणि सय्यद किरमानी (कभी अजनबी थे)

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कभी अजनबी थे' या दिग्दर्शक विजय सिंग यांच्या चित्रपटात 1983 च्या विश्वजेत्या क्रिकेट संघातील स्टार जोडी झळकली होती. संदीप पाटील आणि सय्यद किरमानी यांनी रॉमँटिक ड्रामा असलेल्या चित्रपटात काम केले होते.  या चित्रपटात सचिन तेंडुलकरही बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्याची भूमिका छोटीसीच होती.   


​ ​

संबंधित बातम्या