क्रिकेट_डायरी : ODI मध्ये 400+ धावा कोणत्या संघानं किती वेळा केल्या आठवतय का?

सुशांत जाधव
Thursday, 9 July 2020

क्रिकेट_डायरीच्या या लेखात आपण क्रिकेटच्या मैदानात चारशे धावा कोण-कोणत्या संघांनी करुन दाखवल्या यावर एक नजर टाकणार आहोत. 
 

पुणे : पंधरा वर्षांपूर्वी क्रिकेटच्या मैदानात निर्धारित 50 षटकात संघाची धावसंख्या 400 होऊ शकते, असा विचारही कोणी करत नव्हते. मात्र बदलत्या काळासोबत क्रिकेटमध्ये धावांची बरसात अनुभव क्रिकेट चाहत्यांना येत गेला. ऐकेकाळी अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य अनेक सामन्यात पाहायला मिळाले. एवढेच नाही तर काही संघांनी 400 पेक्षा अधिक धावसंख्येच लक्ष्य पार करुन ऐतिहासिक विक्रमही संघाच्या खात्यात नोंदवला. क्रिकेट_डायरीच्या या लेखात आपण क्रिकेटच्या मैदानात चारशे धावा कोण-कोणत्या संघांनी करुन दाखवल्या यावर एक नजर टाकणार आहोत. 

दक्षिण आफ्रिकेचा षटकार

क्रिकेटच्या मैदानात चोकर्स म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 400 + धावा करण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तब्बल सहा वेळा हा पराक्रम करुन दाखवलाय. यात ऑस्ट्रेलियन संघाने 2005-06 च्या हंगामात 434 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सामन्याचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने 4 बाद 434 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 9 बाद 438 धावा करत सामना जिंकून दाखवला होता. झिम्बाब्वेविरुद्ध (418/5), वेस्ट इंडीजविरुद्ध (439/2) आणि (408/5), भारताविरुद्ध (438/2) आणि आयर्लंड विरुद्धच्या (411/4) अशी धावसंख्या उभारली होती. 

टीम इंडिया षटकारापासून एक पाउल दूर

भारतीय संघाने 2007 मध्ये बर्मुडा विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा 400 धावांचा टप्पा पार केला होता. (413/5) एवढी धावसंख्या उभारून भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला एकहाती पराभूत केले होते. त्यानंतर श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात (414/7) आणि (404/5) वेस्ट इंडीज विरुद्ध (418/5), दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (401/3) अशी धावसंख्या उभारली होती. 

इंग्लंडचा चौकार

क्रिकेटच्या मैदानात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम हा इंग्लंड संघाच्या नावे आहे. इंग्लंडने तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 बाद 481 धावासंख्या उभारली होती. या सामन्यात त्यांनी भविष्यात पाचशे धावसंख्याही होऊ शकते, याचेच संकेत दिले होते. याशिवाय त्यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध  (418/6), न्यूझीलंडविरुद्ध (408/9) आणि पाकिस्तान विरुद्ध (444/3) अशी धावसंख्या उभारली होती. 

कांगारुंची मजल दुहेरीपर्यंतच

क्रिकेट जगतात सर्वाधिक वेळा विश्वविजेता ठरणाऱ्या आणि दमदार बॅटिंग लायनअप असलेल्या ऑस्ट्रेलियन संघ इतर संघाच्या तुलनेत मागे आहे. त्यांनी दोनवेळा 400 हून अधिक धावा केल्या होत्या. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याचाही समावेश आहे. या सामन्यातील 4 बाद 434 शिवाय आफगाणिस्तान विरुद्ध त्यांनी 6 बाद 417 इतकी धावसंख्या उभारली होती.  

श्रीलंका सिंगलवर थांबली... अन् हारलीही

श्रीलंका संघ 2009-10 च्या हंगामात भारतीय संघाविरुद्ध 8 बाद 411 धावा करत 400 चा पल्ला गाठण्यात यशस्वी ठरला. पण त्यांना भारतीय संघाने दिलेले लक्ष्य प्राप्त करण्यात तीन धावा कमी पडल्या. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 418 धावा केल्या होत्या. निर्धारित 50 षटकात श्रीलंकेचा संघाला तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला.  


​ ​

संबंधित बातम्या