Pro Kabaddi 2019 : यू मुम्बाची यूपी योद्धाकडूनही हार

वृत्तसंस्था
Thursday, 1 August 2019

प्रो कबड्डी ः बचावात वारंवार केलेल्या चुकाच पडल्या महागात 

प्रो कबड्डी
मुंबई : सर्वोत्तम बचावपटू असले, तरी ताळमेळ अजून जमलेला नाही, असे मुंबईच्या प्रशिक्षकांकडून दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. एक दिवसाच्या विश्रांतीनंतरही त्यात फरक पडला नाही आणि यू मुम्बाला प्रो कबड्डीत बुधवारी झालेल्या सामन्यात यूपी योद्धाकडून 23-27 अशी हार स्वीकारावी लागली. 

यंदाच्या स्पर्धेत यूपीचा संघ कमजोर समजला जात आहे; पण त्यांच्यविरुद्धही मुंबईला विजयी कामगिरी करता आली नाही. बचावात केलेल्या चुकांमुळे मध्यंतराला स्वीकारलेली 12-14 अशी दोन गुणांची पिछाडी शेवटपर्यंत कायम राहिली. अंतिम क्षणी 23-25 अशा पिछाडीनंतरही त्याच चुका पुन्हा केल्या. या सामन्यात महत्त्वाच्या वेळी सुरिंदरने केलेल्या चुकाही मुंबईस भोवल्या. 

प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक रक्कम मिळालेल्या मोनू गोयतची पकड करून मुंबई संघाने यशस्वी सुरवात केली. त्यानंतर 2-0 अशी आघाडीही घेतली. सामना चुरशीने पुढे जात असला, तरी मुंबईकडे तीन-तीनच खेळाडू शिल्लक असायचे; पण या तिघांत दोनदाच सुपर टॅकल करता आले. मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा लोण स्वीकारण्याची वेळ मुंबईवर आली. 

जयपूरचा सलग तिसरा विजय 
फॉर्मात असलेल्या जयपूर पिंक पॅंथरने आत्मविश्‍वास हरवलेल्या हरियाना स्टिलर्सचा 37-21 असा पराभव केला. चढाया-पकडींचा लयबद्ध खेळ करत असलेल्या जयपूरने राकेश कुमार मार्गदर्शन करत असलेल्या हरियानाला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. जयपूरचा कर्णधार दीपक हुडाने चढायांत 14 गुण मिळवले. सुरवातीला 10-8 अशी चुरस झाली होती; मात्र त्यानंतर जयपूरने मागे वळून पाहिले नाही.


​ ​

संबंधित बातम्या