बजरंगचे प्रशिक्षक शाको भारतीय संघाचेही मार्गदर्शक

वृत्तसंस्था
Wednesday, 23 October 2019

- भारताचा आघाडीचा कुस्तीगीर बजरंग पुनिया याचे वैयक्तिक प्रशिक्षक शाको बेनटिनिडीस यांना आता भारतीय कुस्तीगीर महासंघाने करारबद्ध केले

- शियाच्या मुराद गैदारोव यांनाही नव्याने प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मुराद यांची नियुक्ती खासकरून दिपीक पुनिया आणि रवी दहिया यांच्यासाठी करण्यात आली आहे

नवी दिल्ली -  भारताचा आघाडीचा कुस्तीगीर बजरंग पुनिया याचे वैयक्तिक प्रशिक्षक शाको बेनटिनिडीस यांना आता भारतीय कुस्तीगीर महासंघाने करारबद्ध केले असून, आता ते भारतीय संघालाही देखील मार्गदर्शन करणार आहेत. 
भारतीय कुस्तीगीर महासंघाने त्यांना टोकियो ऑलिंपिकपर्यंत करारबद्ध केले असून, रशियाच्या मुराद गैदारोव यांनाही नव्याने प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मुराद यांची नियुक्ती खासकरून दिपीक पुनिया आणि रवी दहिया यांच्यासाठी करण्यात आली आहे. 
शाको हे सध्या बजरंगचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. त्यांची नियुक्ती "जेएसडब्ल्यू'ने केली आहे. मात्र, कुस्ती महासंघ सुरवातीपासून त्यांना करारबद्ध करण्यास उत्सुक होते. त्यांनी सुरवातीला महासंघाचा प्रस्ताव धुडकावला होता. त्याचबरोबर जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत त्यांच्या आक्षेपामुळेच बजरंगचे अंतिम फेरी खेळण्याचे स्वप्न भंगले, असे महासंघाचे म्हणणे होते. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाको यांना बदलण्यासाठी महासंघ बजरंगवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत होते. बजरंगने त्यांची हकालपट्टी केली, अशी बातमी देखील मधल्या काळात पसरली होती. मात्र, बजरंगने आपल्यासाठी शाको हेच सर्वोत्तम आहेत आणि त्यांच्याशी समन्वय जुळून आल्याचे सांगितले. त्या वेळी महासंघाने त्याचे म्हणणे मान्य केले. मात्र, त्यांना महासंघाच्या अधिपत्याखाली काम करण्याची अट घातली. 
भारतीय मल्लाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे बजरंग शाको यांच्यासाठी आग्रही असेल, तर आमची त्याला हरकत नसेल, असे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. 
त्याचवेळी बजरंगसाठी शाको यांची नियुक्ती करणाऱ्या "जेएसडब्ल्यू' या व्यवस्थापन कंपनीने महासंघाच्या या निर्णयाला हरकत घेतलेली नाही. त्यांचा एक अधिकारी मनीषा मल्होत्रा म्हणाल्या, ""हा संक्रमाणाचा काळ असून, त्यांनी शाको यांना हटवलेले नाही. फक्त त्यांच्यावर महासंघाचे नियंत्रण असेल. आमची याला काहीच हरकत नाही.'' 
-------------- 
दोन्ही प्रशिक्षकांना घसघशीत मानधन 
शाको आणि मुराद गैदारोव यांना भारतीय कुस्तीगीर महासंघाने करारबद्ध केले असल्यामुळे आता त्यांचे मानधन महासंघाच्या वतीने देण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना आता प्रतिमहिना 5 हजार डॉलर म्हणजे तब्बल साडेतीन लाख रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या