हिंदकेसरी' आंदळकर यांचे पुण्यात निधन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 September 2018

दीड वर्षापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यात त्यांची स्मृती गेली. गेले सहा महिने ते झोपूनच होते. तेव्हापासून ते पुण्यात मुलगा अभिजित याच्याकडेच होते. आज रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

'पुणे : आखाड्यात पाऊल ठेवल्यापासून लाल मातीशी नाळ जोडले गेलेले हिंदकेसरी गणपतराव आंदळकर (वय 86) यांचे आज येथे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या दुपारी पुनवत (ता. शिराळा) या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. 

दीड वर्षापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यात त्यांची स्मृती गेली. गेले सहा महिने ते झोपूनच होते. तेव्हापासून ते पुण्यात मुलगा अभिजित याच्याकडेच होते. आज रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

"कुस्ती हाच माझा प्राण आणि तालीम हा माझा श्‍वास' या ब्रीदवाक्‍याला ते अखेरपर्यंत जागले. आखाड्यातील हार-जीतचा विचार न करता त्यांनी शेकडो कुस्त्या केल्या. यातील बहुतांशी कुस्त्या त्यांनी जिंकल्या. 

"हिंदकेसरी' कुस्तीला सुरवात झाल्यापासून पहिले दोन्ही किताब महाराष्ट्राच्या मल्लांनी मिळविले. यात 1959 मध्ये श्रीपती खंचनाळे यांनी पहिला, तर दुसरा 1960 मध्ये आंदळकरांनी पंजाबचे मल्ल खडकसिंग यांना हरवून मिळविला होता. जकार्ता येथे 1962 मध्ये झालेल्या अशियाई स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन प्रकारात सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. टोकिओमध्ये 1964 मध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. त्याच वर्षी त्यांना केंद्र सरकाराने अर्जुन पुरस्काराने गौरविले होते. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल 1982 मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले. 

त्यांनी कारकिर्दीत दोनशेहून अधिक कुस्ती केल्या. या कुस्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील चाळीसपेक्षा अधिक कुस्त्या त्यांनी पाकिस्तानी मल्लांना पराभूत करून जिंकल्या. देशभरात प्रतिष्ठित मल्ल मैदाने गाजवत असताना आंदळकारांनी कोल्हापूरचा डंका कायम वाजवत ठेवला होता. पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, श्रीरंग जाधव, बनातसिंग पंजाबी अशा अनेक दिग्गज मल्लांशी ते झुंजले. 

कुस्ती सोडल्यानंतरही ज्या मोतीबाग तालमीने त्यांना घडवले त्याच तालमीत ते मल्ल घडविण्याचे काम करत होते. लाल मातीशी असलेली नाळ त्यांनी सोडली नसली, तरी बदलत्या काळातील मॅटचे तंत्रही त्यांनी अवगत केले. महाराष्ट्रात मॅटवरील कुस्तीचा प्रसार करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. गाव तिथे तालीम आणि तालीम तिथे मॅट असा आग्रह सर्वप्रथम त्यांनीच धरला. दादू चौगुले, चम्बा मुत्नाळ, विष्णू जोशीलकर, संभाजी पाटील, ऍग्नेल निग्रो, विष्णू जोंभाजी वरुटे, रामचंद्र सारंग, चंद्रहार पाटील असे अनेक मल्ल त्यांनी महाराष्ट्राला दिले.

संबंधित बातम्या