जागतिक मैदानी स्पर्धा - उत्तेजक सेवनाची काळी किनार

नरेश शेळके
Tuesday, 24 September 2019

-ऑलिंपिक असो की जागतिक मैदानी स्पर्धा त्यात उत्तेजकाचे सेवन करणाऱ्यांवर कायम नजर असते. तसाही हा विषय आता स्पर्धा असली किंवा नसली तरी वर्षभर कायम असतो

-कॅस्टर सेमेन्याच्या शरीरात निर्धारीत प्रमाणापेक्षा अधिक टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक असल्याने तिला जागतिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही

-उत्तेजक सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने रशियाप्रमाणे केनिया महासंघावरही बंदी येऊ शकते

ऑलिंपिक असो की जागतिक मैदानी स्पर्धा त्यात उत्तेजकाचे सेवन करणाऱ्यांवर कायम नजर असते. तसाही हा विषय आता स्पर्धा असली किंवा नसली तरी वर्षभर कायम असतो. जागतिक मैदानी स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने उत्तेजकाचे सेवन करणाऱ्या खेळाडूंना शोधून काढण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांच्या साथीला जागतिक उत्तेजकविरोधी संस्था (वाडा) आणि ऍथलेटिक्‍स इंटेग्रिटी युनिट (एआययू) आहे. स्पर्धेपूर्वीच यासंबंधी धक्के बसायला लागले आहेत. कॅस्टर सेमेन्याच्या शरीरात निर्धारीत प्रमाणापेक्षा अधिक टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक असल्याने तिला जागतिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. याच नियमामुळे केनियाने जॅकलीन वाम्बुई आणि लिंडा कहेगा या दोन धावपटूंना वगळले आहे. महिलांसाठी टेस्टोस्टेरॉनचा नियम लागू झाल्यापासून एखाद्या महासंघाने खेळाडूंना वगळण्याची ही पहिलीच घटना होय. रशियानंतर केनिया सध्या वाडाच्या रडारवर आहे. त्यातच एका जर्मन वाहिनीने केलेल्या स्टिंगमुळे सध्या खळबळ माजली आहे. या वाहिनीच्या मते केनियातील जवळ-जवळ सर्व आघाडीचे धावपटू सरावादरम्यान कामगिरी उंचावणारे उत्तेजक ईपीओचे सेवन करतात. दोहाला जाणाऱ्या संघातील आठ धावपटूंनी असे सेवन केले आहे, अशी माहिती एका फिजिशियन दिल्याचा दावा जर्मन वाहिनीने केला आहे. त्यामुळे साहजिकच केनियन धावपटूंच्या कामगिरीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाईल. सध्या केनियाचे 41 धावपटू उत्तेजकामुळे बंदीची शिक्षा भोगत आहे. 
उत्तेजक सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने रशियाप्रमाणे केनिया महासंघावरही बंदी येऊ शकते. केवळ रशिया किंवा केनियाच नव्हे अमेरिकासारख्या दिग्गज आणि बहरीन, भारतासारख्या आशियात चमकदार कामगिरी करणाऱ्या देशातील ऍथलिट्‌सवरही वाडा आणि एआययूच्या अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे. आतापर्यंत जागतिक स्पर्धेतील चाचणीनंतर रशियाला 24, तर अमेरिकेला 14 पदके गमवावी लागली आहेत. युक्रेनने दोन पदके गमावली आहेत. भारताला पदक गमवावे लागले नसले, तरी थाळीफेकपटू नीलम जसवंत सिंग उत्तेजक सेवनात सापडल्याची नोंद आहे. मध्य आशियात प्रथमच होत असलेली ही स्पर्धा उत्तेजकाच्या प्रकरणामुळे नव्हे, तर खेळाडूंच्या कामगिरीने लक्षात रहावी, हीच अपेक्षा ! 
 


​ ​

संबंधित बातम्या