महिला फुटबॉल विश्वकरंडक : अमेरिकेचे विजेतेपद अन्‌ ट्रम्प यांची कोंडी

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

ट्रम्प यांना पन्नास टक्के ठेंगा 
- गोल्डन स्टेट वॉरियर्सने 2017 मध्ये एनबीए जिंकल्यावर त्यांना ट्रम्प यांनी निमंत्रित केले होते, पण त्यांनी यास नकार दिला.

- एवढेच नव्हे तर अमेरिकेतील वीस निंमंत्रित संघांपैकी दहा संघांनी व्हाईट हाऊस भेटीस नकार दिला आहे.

 

पॅरीस / न्यूयॉर्क : विश्वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धा अमेरिकेनेच जिंकल्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोंडी झाली आहे. आता ते मानहानी टाळण्यासाठी जगज्जेत्या अमेरिका संघास व्हाईट हाऊसवर निमंत्रितच करणार नसल्याची चर्चा आहे. 

मेगान रॅपिनोए हीने विश्वकरंडक स्पर्धा सुरु असताना आपण व्हाईट हाऊसबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे ट्रम्प चिडले होते आणि त्यांनी स्पर्धा जिंका आणि मग बोला असे सुनावले होते. त्यामुळे अमेरिकेच्या कामगिरीबाबत कमालीचे औत्सुक्‍य निर्माण झाले. आता अमेरिकेने नेदरलॅंडस्‌ला हरवून जागतिक विजेतेपदच जिंकले नाही, तर ट्रम्प यांच्याकडून टीकेचे लक्ष्य झालेली रॅपिनोए हीची गोल्डन बॉल तसेच गोल्डन बूट पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांचे यश हे आपली ओळख निर्माण करणाऱ्या खेळाडूंचे यश मानले जात आहे. 

ट्रम्प यांना पुढील वर्षीच्या निवडणूकीत एक महिला आव्हान देणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अमेरिका फुटबॉल संघास लाभणारा पाठिंबा लक्षवेधक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष होते. ट्रम्प यांनी जगज्जेत्या महिला संघाचे कौतुक केले. तुमचा अमेरिकेला अभिमान वाटतो असे म्हंटले, पण व्हाइट हाऊस निमंत्रणाबाबत काहीही बोलणे टाळले. ट्रम्प यांनी निमंत्रणाबाबत अद्याप विचार केला नसल्याचे संकेत रविवारी दिले असल्याचे सांगितले जात आहे. 

ट्रम्प यांनी टायगर वूडस्‌ने मास्टर्स स्पर्धा जिंकल्यावर त्याचे खास सन्मान देऊन कौतुक केले, तसेच माजी एनबीए खेळाडू जेरी वेस्ट यांचेही लवकरच कौतुक होणार असल्याचे सांगितले. 

अमेरिकेने विजेतेपद जिंकल्यावर संघाच्या व्हाईट हाऊस भेटीबाबत प्रश्न येणे स्वाभाविकच होते. मार्गदर्शिका जिल एलिस यांनी अजून निमंत्रणच आले नसल्याचे सांगितले. त्यावर एका पत्रकाराने नक्कीच येईल, अशी टिप्पणी केल्यावर मला नाही तसे वाटत असे एलिस म्हणाल्या. 

ट्रम्प यांना पन्नास टक्के ठेंगा 
गोल्डन स्टेट वॉरियर्सने 2017 मध्ये एनबीए जिंकल्यावर त्यांना ट्रम्प यांनी निमंत्रित केले होते, पण त्यांनी यास नकार दिला. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील वीस निंमंत्रित संघांपैकी दहा संघांनी व्हाईट हाऊस भेटीस नकार दिला आहे. या वादात ऊडी घेत बिल क्‍लिंटन यांनी वीस वर्षापूर्वी जगज्जेतपद जिंकलेल्या अमेरिका महिला फुटबॉल संघासोबतचे छायाचित्र ट्‌वीट केले. 

थेट प्रक्षेपणात ट्रम्प लक्ष्य 
अमेरिकेने विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यावर विविध चाहत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या, त्यावेळी पॅरीसमधील अमेरिका पाठीराख्यांनी ट्रम्प यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने फॉक्‍स न्यूजला थेट प्रक्षेपण खंडीत करावे लागले. हे चाहते सुरुवातीस अमेरिका संघाचे कौतुक करीत होते, पण आपली प्रतिक्रिया लाइव्ह जात आहे हे पाहिल्यावर त्यांनी ट्रम्प यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले.

संबंधित बातम्या