World Cup 2019 : बेजबाबदार फलंदाजीमुळे श्रीलंका 1 बाद 67 वरून सर्वबाद 203

वृत्तसंस्था
Friday, 28 June 2019

श्रीलंकेच्या फलंदाजांना 50 षटकांचा सामना असल्याचा विसर पडला आणि संयम राखताच आला नाही.

वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्‍यक, सहा धावांच्या सरासरीची 1 बाद 67 अशी ठोस सुरुवात, पण फलंदाजांचे अवसानघात आणि सर्वबाद 203 ही श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी ठरली. 

इंग्लंडला पराभवाचा धक्का देत स्पर्धेत सनसनाटी निर्माण करणाऱ्या श्रीलंकेने स्वतःसह इतर दोन संघांच्याही आव्हानात हवा भरली, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खराब फलंदाजीने स्वतःची हवा कमी केली. आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मात्र संधीचा फायदा घेतला. 

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या कमकुवत गोलंदाजीची चर्चा अधिक झाली होती. आज ख्रिस मॉरिस, द्वेनी प्रिटोरिस यांनी प्रत्येकी तीन विकेटची कमाई केली. रबाडाने दोन विकेटचे योगदान दिले. इतकेच नव्हे, तर तळ्यात मळ्यात करणाऱ्या जेपी ड्युमिनीनेही वाहत्या गंगेत हात धुताना एक फलंदाज बाद केला. पण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विकेट मिळविल्यापेक्षा श्रीलंकेच्या फलंदाजांनी विकेट बहाल केल्या असेच पहिल्या डावाचे चित्र होते. 

रबाडाने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार करुणारत्नेला बाद केले, पण नवोदित अविष्का फर्नांडो आणि कुशल परेरा यांनी प्रतिहल्ला करत सहा धावांच्या सरासरीने 66 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दक्षिण आफ्रिका गोलंदाजांची लय हरपल्याचे स्पष्ट जाणवत होते. श्रीलंका त्रिशतकी धावा उभारण्याचे चित्र निर्माण झाले होते. पण श्रीलंकेच्या फलंदाजांना 50 षटकांचा सामना असल्याचा विसर पडला आणि संयम राखताच आला नाही. हे दोघेही फलंदाज प्रत्येकी 30 धावांवर बाद झाले. 

3 बाद 72 अशा अवस्थेनंतर कोणी तरी डाव सावरण्याची गरज होती. अनुभवी आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज योग्य वेळी मैदानात आला. इंग्लंडविरुद्ध त्याची खेळी निर्णायक ठरली होती. आज मात्र त्याचा प्रतिकार तोकडा पडला. त्यानंतर एकेक फलंदाज हजेरी लाऊन आणि विकेट बहाल करून परतू लागला. तिसरा परेराने 21 धावांचे योगदान दिले आणि अखेरचा फलंदाज लसिथ मलिंगाने एक चौकार मारला, तेव्हा कोठे श्रीलंकेचा द्विशतकी टप्पा गाठता आला. 

मधमाशांची भूणभूण 
श्रीलंकेच्या डावात 48 व्या षटकांत अचानक मधमाशांनी मैदानावर आक्रमण केले. त्यामुळे काही क्षण खेळाडू मैदानावर पडून राहिले, पण काही क्षणात मधमाशा निघून गेल्या आणि खेळ सुरु झाला. 

संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका :
49.3 षटकांत सर्वबाद 203 (कुशल परेरा 30 -34 चेंडू, 4 चौकार, अविष्का फर्नांडो 30 -29 चेंडू, 4 चौकार, कुशल मेंडिस 23, तिसारा परेरा 21 -25 चेंडू, कागिसो रबाडा 10-2-36-2, ख्रिस मॉरिस 9.3-0-46-3, द्वेनी प्रिटोरिस 10-2-25-3, ड्युमिनी 2-0-15-1


​ ​

संबंधित बातम्या