World Cup 2019 : रोहितचे चौथे शतक; भारताने उभारले 314 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
Tuesday, 2 July 2019

हिटमॅन रोहित शर्माने स्पर्धेतील चौथे शतक झळकावून भारताला बांगलादेश समोर प्रथम फलंदाजी करताना 9 बाद314 धावांचे आव्हान उभारायला सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माने (104 धावा) लोकेश राहुल (77 धावा) सह सलामीला रचलेली 180 धावांची जबरदस्त भागीदारी मोठ्या धावसंख्येचा पाया ठरली.

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : हिटमॅन रोहित शर्माने स्पर्धेतील चौथे शतक झळकावून भारताला बांगलादेश समोर प्रथम फलंदाजी करताना 9 बाद314 धावांचे आव्हान उभारायला सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माने (104 धावा) लोकेश राहुल (77 धावा) सह सलामीला रचलेली 180 धावांची जबरदस्त भागीदारी मोठ्या धावसंख्येचा पाया ठरली.

बांगलादेशच्या सुमार गोलंदाजीचा भारतीय फलंदाजांना खरपूस समाचार घेतला. भारतीय फलंदाज भरात आले असताना मुस्तफीजूरने 5 बळी मिळल्याने धावसंख्या 350 ला पोहोचली नाही.  नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यावर विराट कोहलीने त्वरित फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन बदल केले गेले. गेल्या सामन्यातील चुकीची कुर्‍हाड केदार जाधववर पडली आणि त्याची जागा दिनेश कार्तिकला दिली गेली. कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला मिळाली. बांगलादेशने मेहदी मीराजला वगळताना एक ना दोन 5 मध्यमगती गोलंदाज संघात ठेवले. 

सामन्याला सुरुवात झाली आणि तमीम इक्बालने 9 धावांवर खेळणार्‍या रोहित शर्माचा सोपा झेल सोडला. त्याच संधीचा फायदा घेत सहज सोप्या शैलीत फटकेबाजी चालू केली. 30 यार्डच्या वर्तुळाबाहेर दोनच खेळाडू उभे असल्याने रोहितने हवेतून फटके मारले. बांगलादेशी मध्यमगती गोलंदाज फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर काहीच प्रभाव पाडू शकत नव्हते. 

अगोदरच्या सामन्यात अडखळत फलंदाजी करणार्‍या लोकेश राहुलला थोडा सूर गवसला. दोघा फलंदाजांनी खराब चेंडूंवर चौकार षटकार मारताना चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा जमा केल्या. 3 षटकार मारल्याने रोहितचे अर्धशतक 45 चेंडूत पूर्ण झाले. त्यानंतर रोहित शर्माने आक्रमणाची धार वाढवली. विश्वास परत मिळवलेल्या राहुलने अर्धशतकी मजल मारली. बघता बघता रोहितने स्पर्धेतील चौथे शतक झळकावले आणि त्याने भारतीय संघ आणि प्रेक्षकांसह पत्नी-मुलीकडे बॅट उंचावून आनंद व्यक्त केला. त्याच झेपेत रोहित स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 

शतकानंतर रोहित जास्त काळ टिकला नाही. लोकेश राहुलने मोठी खेळी करायची संधी दवडली. चांगल्या 77 धावा करून राहुल बाद झाला. विराट कोहलीने झकास सुरुवात केल्यावर खराब चेंडूवर फटका मारताना सोपा झेल दिला. मुस्तफीजूरने विराट कोहली आणि हार्दिक पंड्याला पाठोपाठ बाद करून सामन्यात जिवंतपणा आणला. 

मानाच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची संधी मिळालेल्या रिषभ पंतने बांगलादेश समोर 48 धावांची अपेक्षा वाढवणारी खेळी केली. दिनेश कार्तिकला पण मुस्तफीजूरने आखूड टप्प्याचा चेंडू टाकून झेल द्यायला भाग पाडले. प्रमुख फलंदाज समोरून बाद होत असताना जबाबदारी परत एकदा महेंद्र सिंह धोनीवर आली. बाहेर होणार्‍या टीकेला त्याच्या शैलीत उत्तर देताना धोनीने 35 धावा केल्याने भारताला 50 षटकांच्या अखेरीला 9 बाद 314 चा धावफलक उभारता आला.  बांगलादेश कडून पाचफलंदाजांना बाद करणारा मुस्तफीजूर हिरो ठरला.


​ ​

संबंधित बातम्या