World Cup 2019 : पावसामुळे उघडले द. आफ्रिकेचे खाते; वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द

वृत्तसंस्था
Monday, 10 June 2019

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे गुणांचे खाते अखेर सोमवारी उघडले. वेस्ट इंडिजविरुद्धचा त्यांचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला.

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे गुणांचे खाते अखेर सोमवारी उघडले. वेस्ट इंडिजविरुद्धचा त्यांचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण देण्यात आला.

सामन्याला येथे सुरवात होताना स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. सामना सुरू देखील झाला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी बोलावले. मात्र, अपयशाने दक्षिण आफ्रिकेची पाठ सोडली नाही. शेल्डन कॉट्रेल याने द. आफ्रिकेच्या सलामीच्या जोडीला बाद केले. प्रथम आमला स्लिपमध्ये गेलकडे झेल देऊन बाद झाला, नंतर मार्करमचा झेल यष्टिरक्षक शाय होपने डावीकडे झेपावत सुरेख टिपला. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था 7 षटकांत 2 बाद 28 अशी झाली होती. त्या वेळी पावसाला सुरवात झाली आणि त्यानेच नंतर प्रदिर्घ खेळी केली. पावासाची थांबण्याची लक्षणे दिसत नव्हती. पाऊस थांबल्यावर देखील लख्ख सूर्यप्रकाश नव्हता. अखेरीस पहिल्या डावाची वेळ संपून गेल्यावर पंचांनी निरीक्षण करून सामना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली.

यंदाच्या स्पर्धेत इंग्लंडमधील लहरी हवमानाचा फटका बसलेला हा दुसरा सामना ठरला. यापूर्वी 7 जून रोजी पाकिस्तान वि. श्रीलंका हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. 
दक्षिण आफ्रिकेचे गुणांचे खाते उघडले असले, तरी विजयासाठी उत्सुक असलेल्या वेस्ट इंडिज संघाला याचा फटका बसला असे मानले जात आहे. तीन सामन्यानंतर त्यांचे आता एका विजयासह तीनच गुण झाले आहेत. त्यांना आज विजयाचे दोन गुण मिळविण्याची संधी होती.


​ ​

संबंधित बातम्या