जागतिक बॅडमिंटन: श्रीकांत, सिंधूवर भारताच्या आशा  

वृत्तसंस्था
Sunday, 29 July 2018

जागतिक स्पर्धेत खरंच चांगली कामगिरी करुन दाखवायची आहे. पूर्ण तयारीने मी उतरत आहे. "ड्रॉ' खडतर आहे. या वेळीही सर्वांना ओकुहाराबरोबरच्या लढतीची प्रतिक्षा आहे. पण, त्यापूर्वी फित्रिआनी, सुग ह्यून यांच्याशी मला खेळायचे आहे. जागतिक स्पर्धेत प्रत्येक प्रतिस्पर्धी आव्हानात्मक असतो. 
- पी. व्ही. सिंधू

नान्जिंग (चीन) : महत्त्वाच्या स्पर्धेत अंतिम फेरी पर्यंत पोचून विजेतेपदापासून दूर राहणारी पी. व्ही. सिंधू या अपयशातून बाहेर पडण्यासाठी उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रयत्न करेल. या स्पर्धेत सिंधू आणि पुरुष विभागात अर्थातच के. श्रीकांत यांच्यावर भारताच्या खऱ्या आशा अवलंबून राहणार आहेत. 

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील दोन ब्रॉंझ आणि एक रौप्य अशी कामगिरी करणारी सिंधू या वेळी निश्‍चितच पुन्हा एकदा पदकाचा रंग बदलण्यासाठी उत्सुक आहे. गेल्यावर्षी जागतिक स्पर्धेतील सिंधू आणि ओकुहारा यांच्यात झालेल्या अंतिम लढतीची आजही चर्चा होत आहे. 

यंदाच्या मोसमात आतापर्यंत सिंधूने तीन अंतिम फेरी गाठल्या आहेत, मात्र ती विजेतेपदापासून दूरच राहिलेली आहे. सुरवात सोपी असली, तरी तिसऱ्या फेरीपासून सिंधूसमोर आव्हाने उभी राहतील असे दिसून येत आहे. तिसऱ्या फेरीत सिंधूसमोर कोरियाच्या सुंग जी ह्यून हिचे आव्हान असेल. त्यानंतर तिची आगेकूच कायम राहिल्यास गतविजेत्या ओकुहाराबरोबर तिची उपांत्यपूर्व फेरीतच गाठ पडण्याची शक्‍यता आहे. 

साईना नेहवालची सुरवात पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूबरोबर होईल. पण, त्यानंतर 2013ची विजेती रॅटचनॉक इन्थॅनॉन तिसऱ्या फेरीत तिची प्रतिस्पर्धी असू शकेल. ही लढत जिंकल्यास कॅरोलिन मरिनचे आव्हान तिला पार करावे लागेल. 

पुरुष विभागात मलेशियाच्या लीग चोंग वेई याने घेतलेली माघार भारताच्या के. श्रीकांतच्या पथ्यावर पडू शकते. आयर्लंडच्या एन्गयेन, इंडोनेशियाचा जोनाथन ख्रिस्ती हे त्याचे सुरवातीचे प्रतिस्पर्धी असतील. त्याच्या गटातून चोंग वेई याने माघार घेतल्याने श्रीकांतचा बाद पेरीपर्यंतचा प्रवास अधिक सुकर असेल. 

एच. एस. प्रणॉयसमोर मात्र सुरवातीपासून आव्हानाचा डोंगर उभा असेल. बी. साईप्रणित, समीर वर्मा हे एकेरीत, तर स्वस्तिकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी हे दुहेरीत आपले नशीब अजमावतील. 

जागतिक स्पर्धेत खरंच चांगली कामगिरी करुन दाखवायची आहे. पूर्ण तयारीने मी उतरत आहे. "ड्रॉ' खडतर आहे. या वेळीही सर्वांना ओकुहाराबरोबरच्या लढतीची प्रतिक्षा आहे. पण, त्यापूर्वी फित्रिआनी, सुग ह्यून यांच्याशी मला खेळायचे आहे. जागतिक स्पर्धेत प्रत्येक प्रतिस्पर्धी आव्हानात्मक असतो. 
- पी. व्ही. सिंधू

संबंधित बातम्या