जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेचा आजपासून थरार

नरेश शेळके
Thursday, 26 September 2019

-काही प्रस्थापितांचा जलवा कायम असला तरी उसेन बोल्ट आणि मो फराहचा सुवर्णकाळ संपल्यानंतरची पहिली जागतिक मैदानी स्पर्धा उद्यापासून येथील खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होईल.

-स्पर्धेत 156 खेळाडूंसह सहभागी झालेल्या अमेरिकेचे नेहमीप्रमाणे वर्चस्व राहणार यात शंका नाही.

-मॅरेथॉन आणि 50 व 20 किलोमीटर चालण्याची स्पर्धा समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या कॉर्निश भागात होणार आहे. स्पर्धकांना प्रतिस्पर्ध्यापेक्षा येथील दमट हवमानाशी चांगलीच स्पर्धा करावी लागणार आहे

दोहा - काही प्रस्थापितांचा जलवा कायम असला तरी उसेन बोल्ट आणि मो फराहचा सुवर्णकाळ संपल्यानंतरची पहिली जागतिक मैदानी स्पर्धा उद्यापासून येथील खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होईल. स्पर्धेसाठी ट्रॅकचा रंगमंच तयार झाला असून पुढील दहा दिवस ऍथलेटिक्‍सच्या या भव्य रंगमंचावरून कोण नवीन तारा उदयास येतो, हे पाहणे मनोरंजक ठरेल. 
स्प्रिंट शर्यतीत अमेरिका विरुद्ध जमैका, लांब पल्ल्याच्या शर्यतीत केनिया विरुद्ध इथिओपिया या पारंपरिक लढती पाहायला मिळू शकतील. फेकीत जर्मनीसह पूर्व युरोपातील देश वर्चस्व राखण्याची शक्‍यता आहे. यजमान कतारसह जपान, चीन, बहरीन येथील ऍथलिट्‌स आशियाचे जागतिक ऍथलेटिक्‍समधील स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करतील. 
स्पर्धेत 156 खेळाडूंसह सहभागी झालेल्या अमेरिकेचे नेहमीप्रमाणे वर्चस्व राहणार यात शंका नाही. ही स्पर्धा अमेरिकन ऍथलिट्‌साठी यासाठी महत्त्वाची आहे; कारण दोन वर्षांनंतरची स्पर्धा अमेरिकेत होत आहे. त्यामुळे विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठी अमेरिकन ऍथलिट्‌स येथूनच सुरवात करतील, अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामीन यांचा मुलगा आणि चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदकाचा दावेदार राय बेंजामीनने दिली. 

दमटपणाचे आव्हान 
मॅरेथॉन आणि 50 व 20 किलोमीटर चालण्याची स्पर्धा समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या कॉर्निश भागात होणार आहे. स्पर्धकांना प्रतिस्पर्ध्यापेक्षा येथील दमट हवमानाशी चांगलीच स्पर्धा करावी लागणार आहे. कारण या आठवड्यात येथील दिवसाचे तापमान 40 अंशापर्यंत पोचले असल्याने मध्यरात्रीसुद्धा उकाडा 80 टक्‍क्‍याच्या वर आहे. अशावेळी प्रचंड घाम जाऊन स्पर्धक कोसळण्याची शक्‍यता अधिक आहे. ही बाब विचारात घेऊन स्पर्धेच्या मार्गावर वैद्यकीय व्यवस्था वाढविण्यात आली आहे. आम्ही पुरेशी व्यवस्था केली आहे, मात्र परिस्थितीमुळे स्पर्धा आव्हानात्मक आहे, ही बाब आयएएएफचे अध्यक्ष सॅबेस्टीयन को यांनी मान्य केली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महिला मॅरेथॉनचे सुवर्णपदक निश्‍चित होणार आहे. 

भारतीयांची अग्नीपरीक्षा 
भविष्यात भारतीय ऍथलेटिक्‍समधील स्टार होऊ शकेल, अशी ज्याच्याकडून आशा केली जात आहे असा 20 वर्षीय श्रीशंकर मुरली पहिल्या दिवशी लांब उडीत भाग घेत आहे. त्याच्या 8.20 मीटर या सर्वोत्तम कामगिरीमुळे तो सहभागी होणाऱ्या 27 स्पर्धकांत 26 व्या स्थानावर आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याला एकतर 8.15 मीटर उडी मारावी लागेल किंवा प्रथम बारा स्पर्धकांत स्थान मिळवावे लागेल. श्रीशंकरचे वडील भारतीय महासंघाने प्रशिक्षकाच्या यादीत स्थान न दिल्याने माजी आंतरराष्ट्रीय ऍथलिट्‌ असलेले मुरली स्वःखर्चाने पुत्र प्रेमासाठी येथे दाखल झाले आहेत. 
--- 

लक्ष यांच्या कामगिरीकडे 
नोह लिलेस, ख्रिस्तीयन कोलमन, राय बेंजामिन (अमेरिका) 
योमिफ कजेलचा, क्‍युबाचा जुआन मिगेल इचेवरीया (इथियोपिया) 
सिफान हसन, (नेदरलॅंड) 
डायना अशर स्मिथ (ग्रेट ब्रिटन) 
सल्वा नासेर (बहारिन) 
-------- 

डोपिंग रोखण्यासाठी 
- स्पर्धेपूर्वी विविध देशांतील 700 खेळाडूंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. 
- स्पर्धेच्या काळात जवळ-जवळ 500 नमुने (मुख्यत्वे युरीन) घेण्यात येईल. 
- स्पर्धेच्या आधी आणि स्पर्धेच्या काळात यजमान देशातील खेळाडूंचे घेतलेले नमुने इतर देशातील प्रयोगशाळेत तपासणार. 
 


​ ​

संबंधित बातम्या