Asian Games 2018 : चिनी भिंत भेदत भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
Thursday, 30 August 2018

जाकार्ता : भारतीय महिला हॉकी संघाने थेट ऑलिंपिक पात्रतेच्या आशा कायम ठेवताना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीयांनी उपांत्य फेरीत चीनचे कडवे आव्हान 1-0 असे परतवत आगेकूच केली. भारताची आता विजेतेपदासाठी लढत जपानविरुद्ध होईल. 

जाकार्ता : भारतीय महिला हॉकी संघाने थेट ऑलिंपिक पात्रतेच्या आशा कायम ठेवताना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीयांनी उपांत्य फेरीत चीनचे कडवे आव्हान 1-0 असे परतवत आगेकूच केली. भारताची आता विजेतेपदासाठी लढत जपानविरुद्ध होईल. 
पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात वाक्‌बगार असलेल्या गुरजीत कौरने चौथ्या सत्रात गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडताना अखेर पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. गुरजीतनेच अखेरच्या टप्प्यात पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करीत भारतास कोरियाविरुद्धच्या साखळी लढतीत विजयी केले होते, तीच पुन्हा भारतीय संघाची तारणहार ठरली. तिची जागतिक महिला हॉकीतील सर्वोत्तम ड्रॅग फ्लीकमधील गणना होते ती योग्यच आहे, हे दाखवले. 

भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेतील साखळीत 38 गोल करताना एकच स्वीकारला होता, तर चीनने साखळीत सहा गोल स्वीकारले होते, त्यामुळे चीन सुरवातीस बचावात्मक राहणार याची भारतास जाणीव होती. भारतीयांनी त्यामुळे आक्रमकच सुरवात केली होती. मात्र चीनने बचावावर जास्त भर दिल्याने भारतास गोलपासून वंचित राहावे लागले. त्यातच गोलक्षेत्रातील चुकांमुळे मार्गदर्शक शूअर्ड मरिन संतापले होते. त्याचा परिणाम भारताच्या खेळावर दुसऱ्या सत्रात झाला. त्या वेळी चीन प्रतिकार करणार असेच वाटत होते, पण भारताने अखेरच्या दोन सत्रांत चीनला प्रतिआक्रमणाची क्वचितच संधी दिली. 

भारतीय बचावही आक्रमणाच्या तोडीचाच होता. चीनला गोलच्या दोनच संधी मिळाल्या होत्या, त्यावरून भारतीय बचावाची ताकद लक्षात येते. चीनने गोलच्या पिछाडीनंतरच यातील एक संधी मिळवली होती. भारतीय संघव्यवस्थापनास सातपैकी एकाच पेनल्टी कॉर्नरवर गोल झाला हे सलत असेल. त्यातही सुरवातीस भारताने ड्रॅग फ्लीकऐवजी इनडायरेक्‍ट प्रयत्नांवर भर दिला. त्यातील अपयश हे सलणार होते. त्याचबरोबर भारताकडून मैदानी गोलच्या पाच संधी दवडल्या गेल्या. 
भारताची अंतिम फेरीत लढत जपानविरुद्ध होईल. जपानने कोरियाचे आव्हान 2-0 असे परतवले. बचावावर भर दिलेल्या कोरियाची नेमबाजी सदोष होती. ते जपानच्या पथ्यावर पडले. जपानने एक मैदानी आणि एक पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत कोरियाला हरवले. 

भारत यश 
- भारतास 1982 च्या एशियाडमधील सुवर्ण कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी 
- भारतास या कामगिरीनंतर दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची संधी 
- 1998 च्या स्पर्धेत भारतास रौप्यपदक, त्या वेळी कोरियाविरुद्ध हार 
- गतस्पर्धेत भारतीय महिला हॉकीस ब्रॉंझपदक, त्यापूर्वी चौथे स्थान 
- भारतीय महिला हॉकीस आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्रॉंझ 


​ ​

संबंधित बातम्या