कोण म्हणतो महिला क्रिकेटवर अन्याय झाला? वाचा कोणी केलेय बीसीसीआयचे समर्थन

शैलेश नागवेकर
Monday, 27 July 2020

एकीकडे आयपीएलची तयारी करत असताना दुसरीकडे इंग्लंडमधील महिलांच्या तिरंगी स्पर्धेत भारताचा महिला संघ न पाठवण्याचा निर्णय घेणे यावर बीसीसीआयवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : एकीकडे आयपीएलची तयारी करत असताना दुसरीकडे इंग्लंडमधील महिलांच्या तिरंगी स्पर्धेत भारताचा महिला संघ न पाठवण्याचा निर्णय घेणे यावर बीसीसीआयवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. परंतु अपेक्‍स कॉन्सिलच्या सदस्या आणि माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी बीसीसीआयचीच बाजू घेतली आहे. महिला क्रिकेटकडे बीसीसीआयचे दूर्लक्ष नाही किंवा निष्काळजीपणाही दाखवत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

इंग्लंडमध्ये पुरुषांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले आहे. आता महिलांचीही तिरंगी एकदिवसीय स्पर्धा होणार आहे. तिसरा संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केला असताना, भारताने मात्र स्पर्धेतून माघार घेतली त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या. मात्र रंगास्वामी यांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे समर्थन केले. महिला क्रिकेटवर अन्याय करण्याचा प्रश्‍न नाही, कोरोनानंतरच्या लॉकडाउननंतर कोणत्याही खेळाडूला मॅच फिटनेस मिळवण्यासाठी किमान सहा आठवड्यांची आवश्‍यकता असते, महिलांसाठी आपण आत्ताच सराव शिबिर आपण आयोजित करू शकतो का? तसेच इंग्लंडमध्ये गेल्यावर 14 दिवसांचे विलगीकरणही करावे लागणार आहे, असे रंगास्वामी यांनी सांगितले. 

पुढील वर्षाच्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी आयोजकांनी घेतले मोठे निर्णय 

आयपीएलमध्येही महिला क्रिकेटचे सामने होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महिला क्रिकेटबाबत बीसीसीआय गंभीर नसल्याची टीका करण्यात आली. इतकेच नव्हे तर पुढील फेब्रुवारी-मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय महिलांना पुरेसे सामने मिळणार नसल्याचेही बोलले जात आहे. तरीही रंगास्वामी मात्र बीसीसीआयचेच समर्थन करत आहेत. कोरोनाने इतर खेळांबरोबर क्रिकेटचे आणि प्रामुख्याने महिला क्रिकेटचे नुकसान केले आहे. या महामारीनंतर सावरायला वेळच मिळालेला नाहे, असे त्या म्हणतात. 

अमिरातीत आयपीएल ज्या कालावधीत होणार आहे त्याच वेळी ऑस्ट्रेलियात बीग बॅश होणार आहे. त्या स्पर्धेत भारताच्या तीन-चार महिला खेळाडू महिलांच्या बीग बॅशमध्ये खेळण्याची शक्‍यता आहे. यंदा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार एप्रिल-मे महिन्यात आयपीएल झाली असती तर तीन ऐवजी चार संघांचा आम्ही विचार करत होतो. परंतु आत्ता सर्वच चित्र बदलले आहे. अमिरातीत आपल्याला आयपीएल घ्यावी लागत आहे. त्याच काळात बीग बॅशही आहे. आयपीएलपेक्षा इंग्लंड दौरा पुढील विश्‍वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी मोलाचा ठरला असता असे रंगास्वामी म्हणतात, परंतु इंग्लंडमध्ये भारतीय संघ न पाठवण्याचे योग्य समर्थन त्या करू शकल्या नाहीत.


​ ​

संबंधित बातम्या