आता विंडीज येणार भारतीय दौऱ्यावर

वृत्तसंस्था
Thursday, 30 August 2018

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या  वेस्ट इंडिजच्या भारतीय दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दौऱ्यात भारत वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी20 सामने खेळणार आहे. 

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या  वेस्ट इंडिजच्या भारतीय दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दौऱ्यात भारत वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी20 सामने खेळणार आहे. 

भारतीय क्रिकेट संघ सध्या प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 11 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ लगेचच आशिया करंडक खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना होणार आहे. आशिया करंडकातील पहिला सामना 15 सप्टेंबरला सुरु होणार आहे. भारतीय संघ आशिया करंडकात पहिला सामना 18 सप्टेंबरला खेळणार आहे. 

आशिया करंडक झाल्यावर अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत वेस्ट इंडिजचा भारतीय दौरा सुरु होईल.  हा दौरा संपल्यावर पुन्हा फक्त 10 दिवसांत ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 21 नोव्हेंबरला होणार आहे. 

सततच्या क्रिकेटमुळे भारतीय संघाला या अगोदरच दुखापतींचे ग्रहण लागले आहे. अति क्रिकेटमुळे खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम होतो. भारतीय संघाने वर्षाच्या सुरवातीलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ निदाहास करंडक खेळण्यासाठी श्रीलंकेला गेला होता. त्यानंतर एप्रिल आणि मे महिना आयपीएलच्या धामधुमीत गेल्यावर भारतीय संघ जूनमध्ये लगेचच इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला. भारतीय क्रिकेटमधील अनेक आजी माजी खेळाडूंनी अति क्रिकेटवर वेळोवेळी टिका करुनही बीसीसीआयकडून याकडे दुलर्क्ष केले जात असल्याचेच दिसत आहे.


​ ​

संबंधित बातम्या