BlOG : गोऱ्यांच्या देशात क्रिकेट मैदानावर उठणार अन्यायाविरोधात आवाज

ऋतूराज मोगली
Tuesday, 7 July 2020

यूरोपातील महत्वाच्या फुटबॉल स्पर्धांना सुरुवात झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे.  

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे जगभरातील सर्व क्रीडा क्षेत्रावर अभूतपूर्व संकट कोसळले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून जगभरातील सर्वच क्रीडा स्पर्धांचे आयोजन थांबविण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत क्रीडाविश्वातील विखुरलेली परिस्थिती पुन्हा सामान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये प्रेक्षकांविना क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यूरोपातील महत्वाच्या फुटबॉल स्पर्धांना सुरुवात झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागले आहे. 8 जुलैपासून इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन येथे कोरोनाजन्य परिस्थितीनंतरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड वेस्ट इंडीजसोबतच्या तीन कसोटी सामन्यांचे यजमानपद भूषविणार आहे. व त्यानंतर या दोन्ही संघात तीन टी - 20 सामने देखील खेळवण्यात येणार आहेत. तसेच या मालिकेमध्ये वेस्ट इंडिज संघाचे क्रिकेटपटू वर्णभेदाविरुद्धच्या लढाईला समर्थन देण्यासाठी ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चा लोगो असलेला जर्सी परिधान करणार आहेत. 

#वर्णभेदाचा_खेळ : त्या प्रकरणानंतर म्हणे सायमंड नशेच्या आहारी गेला

इंग्लंड क्रिकेटमध्ये कृष्णवर्णीयांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे काही रिपोर्ट यापूर्वीच समोर आले होते. इंग्लंड क्रिकेटमध्ये  जवळपास 75 टक्के कृष्णवर्णीयांची संख्या कमी झाल्याचे समोर आले होते. या वृत्तानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही सकारात्मक भूमिका घेणार असल्याचेही म्हटले आहे. खेळाडूंची तूट भरुन काढण्यासाठी आम्ही खास उपक्रम राबवण्यास प्रयत्नशील असल्याचेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. इंग्लंड क्रिकेटमधील प्रकार आणि वेस्ट इंडिजने संघाने अमेरिकेतील  जॉर्ज फ्लाइड याच्या मृत्यूनंतर जगभरात सुरू झालेल्या 'ब्लॅक लाइव्हज मॅटर'संदर्भात घेतलेली भूमिकाही  या कसोटी सामन्यात लक्षवेधी ठरेल. कोरोनाच्या संकटातून सावरत इंग्लंड दौऱ्यासाठी राजी झालेल्या वेस्ट इंडिज संघ ज्यावेळी इंग्लंडला रवाना झाला त्यावेळीच जेसन होल्डरला या मुद्यासंदर्भात प्रश्नांचा भडिमार झाला होता. यावेळी त्याने संघाची भूमिका लवकरच जाहीर करून असे सांगितले होते. त्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ विशेष लोगा असणारी जर्सी घालून अमेरिकेतील घटनेचा निषेध करणार असल्याचे स्पष्ट झाले.

#वर्णभेदाचा_खेळ : भेदभाव नडला अन् 22 वर्ष वनवास भोगला!​

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघातील फलंदाजीची तुलना केल्यास 2019 मधील वर्ल्ड चॅम्पियन्सचा संघ काही प्रमाणात वरचढ ठरतो. जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, ओली पोप आणि जो रूट यांसारखे उत्तम फलंदाज इंग्लंडच्या संघात असून बेन स्टोक्स आणि जो डेन्ली या अष्टपैलू खेळाडूंची त्यांना साथ असेल. वेस्ट इंडीज संघाच्या फलंदाजीची मुख्य धुरा शाई होपवर असणार आहे. यासोबतच सराव सामन्यांत चांगली कामगिरी केलेल्या जेरमाईन ब्लॅकवूड आणि एनक्रुमाह बोनर या फलंदाजामध्ये वेस्ट इंडीज संघाकडून मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. क्रॅग ब्रेथवेट देखील संघाच्या फलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. 

#वर्णभेदाचा_खेळ : या खेळाडूच्या प्रतिस्पर्धी बोर्डानेच दुखावल्या होत्या भावना

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघातील गोलंदाजीचा विचार केल्यास वेस्ट इंडीज संघाचे पारडे अधिक मजबूत असणार आहे. या कसोटी मालिकेत वेस्ट इंडीजचा संघ वेगवान गोलंदाजांच्या जोरावर सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर शिस्तबद्ध वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएल पुन्हा मैदानावर पुनरागमन करणार आहे. यासोबतच केमर रोच, कर्णधार जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ आणि रेमन रायफर हे वेगवान गोलंदाज नेहमीप्रमाणेच आक्रमण ठरु शकतात. दुसरीकडे इंग्लंडच्या गोलंदाजीची धूरा स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन या गोलंदाजांवर असणार आहे. जॅक लीच, जोफ्रा आर्चर, साकीब महमूद आणि मॅथ्यू पार्किन्सन या गोलंदाजांची मदत देखील इंग्लंडला होऊ शकते. 

#वर्णभेदाचा_खेळ : साहेबांच्या ताफ्यातील हा प्रतिभावंत खेळाडूही दुखावलाय

यापूर्वीच्या आकडेवारीनुसार, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ 157 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांपैकी 49 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तर 57 सामन्यांत इंग्लंड पराभव पत्करावा लागला आहे. तसेच इंग्लंडमधील खेळपट्ट्या फलंदाजांसाठी नेहमीच अनुकूल राहिल्या आहेत. याव्यतिरिक्त  कोरोनाची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळण्याच्या नियमांमध्ये अंतरिम बदलांची पुष्टी केली होती. ज्यामध्ये चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आयसीसीच्या या निर्णयावर अनेक आजी माजी खेळाडूंनी टीका केली होती.त्यामुळे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान आयसीसीच्या या निर्णयाचा गोलंदाजीवर कोणता प्रभाव पडेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी गोलंदाज वसीम अक्रमने आयसीसीच्या या निर्णयावर तोंडसुख घेताना, यामुळे गोलंदाज रोबोट बनणार असल्याचे म्हटले होते.


​ ​

संबंधित बातम्या