आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पुनर्जन्म; 117 दिवसांनंतर लाईव्ह घडामोडी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

लंडन येथील एजेस बाऊल येथे आजपासून पुनर्जन्माचा सोहळा सुरू होईल तेव्हा सर्व क्रिकेटजगाताचे लक्ष असेल. कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही,  तरीही सुरू होणारे हे क्रिकेट जैविक सुरक्षेच्या सर्व भिंती उभारून पार पडणार आहे

लंडन : क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंडच क्रिकेटच्या पुनर्जन्माचेेेही जनक ठरणार आहे. कोरोनाचा जगभरातील विळखा आणि लॉकडाऊनचे निर्बंध यामुळे ड्रेसिंग रूममध्येच राहणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट अखेर 117 दिवसांनंतर पुन्हा मैदानात येणार आहे. यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून सुरू होणारी कसोटी क्रिकेट मालिका क्रिकेट पुनरागमनाचा नवा इतिहास रचणार आहे. चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव नंतर युरोप, अमेरिका खंड, आशिया असा होऊन त्याने संपूर्ण  जगाला वेठीस धरले; पण `मिशन बिगिन अगेन` कधी तरी व्हायला हवे आणि ते टप्प्या-टप्प्याने सुरूही होत आहे. आता पुन्हा क्रिकेट मैदानावर पाऊल ठेवण्याची वेळ आली आहे.

BlOG : गोऱ्यांच्या देशात क्रिकेट मैदानावर उठणार अन्यायाविरोधात आवाज

117 दिवसानंतर...
कोरोनाचे संकट सुरू होत असताना अखरेचा आंतरराष्ट्रीय सामना 13 मार्च 2020 रोजी झाला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सिडनीतील एकदिवसीय लढतीत प्रेक्षकांना प्रवेश नव्हता. तीन सामन्यांच्या मालिकेतील तो पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता; पण नंतरचे सामने रद्द करण्यात आले होते. अखेर 117 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होणार आहे.

एजेस बाऊलवर सोहळा
लंडन येथील एजेस बाऊल येथे आजपासून पुनर्जन्माचा सोहळा सुरू होईल तेव्हा सर्व क्रिकेटजगाताचे लक्ष असेल. कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही,  तरीही सुरू होणारे हे क्रिकेट जैविक सुरक्षेच्या सर्व भिंती उभारून पार पडणार आहे. खेळाडूंना सर्व निर्बंधांसह आणि नव्या नियमांसह आपले कौशल्य दाखवावे लागणार आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, यापेक्षा क्रिकेट कसे असणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

रंगीत तालिमही यशस्वी
वेस्ट इंडिजचा संघ बराच अगोदर लंडनमध्ये दाखल झालेला आहे. 14 दिवसांच्या विलगीकरणानंतर कोरोना चाचणीचे दिव्य पार करून ते सराव करून नव्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे यजमान इंग्लंड संघात काही दिवसांपूर्वीच सराव सामना झाला. आता पुढचे क्रिकेट कसे असेल, याची  रंगीत तालिमच होती.

 - क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लाळेला बंदी
कोरोनापासून अधिक सुरक्षा बाळगण्यासाठी आयसीसीने नियमावली तयार केली आहे. त्यात चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेला बंदी केली आहे. खेळाच्या ओघात आपली बोटे चुकूनही तोंडात जाणार नाहीत, याची काळजी खेळाडूंना घ्यावी लागणार आहे.

इंग्लंड वि. विंडीज
पहिली कसोटी
थेट प्रक्षेपण: दुपारी 3.30 पासून (सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी)

इंग्लंड-विंडीज कसोटी इतिहास
- एकूण सामने : 159
- इंग्लंड विजयी : 49
- वेस्ट इंडिज विजयी : 57
- अनिर्णित : 51
- अर्धवट अवस्थेत रद्द : 1
- रद्द : 1


​ ​

संबंधित बातम्या