अखेरच्या कसोटीसह मनेही जिंकू : कोहली 

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना भारताने गमावल्यावर विराट कोहलीने पराभवास कोणालाही जबाबदार धरले नाही. याउलट त्याने  इंग्लंडच्या खेळाडूंचे कौतुक केले, तसेच आता पाचवा कसोटी सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही स्पष्ट केले. 

साउदम्पटन : इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना भारताने गमावल्यावर विराट कोहलीने पराभवास कोणालाही जबाबदार धरले नाही. याउलट त्याने  इंग्लंडच्या खेळाडूंचे कौतुक केले, तसेच आता पाचवा कसोटी सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही स्पष्ट केले. 

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला, ''इंग्लंडने आम्हाला आव्हान देण्यासाठी सुरेख कामगिरी केली. तिसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी खेळपट्टीचा अंदाज घेत आपल्या खेळात बदल करत फलंदाजी केली. माझ्या मते भारतीय संघाने खूप चुका केल्या नाहीत. इंग्लंडच्या खेळाडूंनी फक्त आमच्या वरचढ खेळ केला. आम्ही दडपणाखाली असलो तरी सर्व 11 खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची उत्कट इच्छा होती, आणि त्यांना देशासाठी कसोटी सामना जिंकण्याची इच्छा होती. सामन्यात एक मोठा भागीदारीसह तुम्ही आव्हानाचा सहज पाठलाग करु शकता. रहाणे आणि माझ्यात सामना जिंकण्यासाठी समान जिद्द होती.''

संघातील इतर खेळाडूंना पाठीशी घालत तो म्हणाला, '' माझ्या मते या सामन्यात आमच्याकडून फार चुका झाल्या नाहीत. मी अजून थोडावेळ मैदानावर टिकून राहिलो असतो तर कदाचित आम्हाला जास्त धावांची आघाडी घेता आली असती. मात्र पुजाराने सुरेख फलंदाजी केल्याने आम्हाला माफक का होईना पण आघाडी मिळाली. तळातील खेळाडूंनी अत्यंत संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले. खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी धाडसाने फलंदाजी केली.''     

चौथ्या कसोटी सामन्यात भारतासमोर विजयासाठी 245 धावांचे आव्हान होते. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये असल्याने हे आव्हान सामन्याच्या चौथ्या दिवशीसुद्धा आवाक्यात होते. मात्र कोहली आणि रहाणे सोडता भारतीय फलंदाजांनी साधा प्रतिकारही केला नाही आणि त्यामुळे भारताचा 60 धावांनी पराभव झाला. या पराभवासह भारताला पाच सामन्यांची कसोटी मालिकाही गमवावी लागली. 


​ ​

संबंधित बातम्या