गर्लफ्रेंड वरून विराटला डिवचले होते ; इंग्लंडच्या 'या' खेळाडूचा खुलासा

टीम ई-सकाळ
Monday, 15 June 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी विराट कोहलीला स्लेजिंग करणे अधिकच धोकादायक असल्याचे म्हटले आहे.      
 

खेळ म्हटले की डावपेच आलेच. त्यामुळे जगातील अनेक खेळात खेळाडू प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच आखत असतात. मात्र कधी कधी हे डावपेच उपयोगी पडले नाही तर, खेळाडू स्लेजिंगचा सहारा घेत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटच्या मैदानावर होणारे स्लेजिंग सारखे प्रकार नवे नाहीत. त्यातल्या त्यात फलंदाजांवर दबाव आणण्यासाठी किंवा बाद करण्यासाठी विरोधी दलातील खेळाडू नेहमीच स्लेजिंग करून उचकवण्याचा प्रयत्न करत असतात. कित्येकदा त्यावेळेस वैयक्तिक जीवनातील कौटुंबिक अथवा खाजगी गोष्टींचा वापर स्लेजिंगसाठी करण्यात येतो. पूर्वी अशाच  स्लेजिंगच्या घडलेल्या घटनेचा खुलासा इंग्लंडच्या क्रिकेट संघातील माजी खेळाडू निक कॉम्पटनने केला आहे. २०१२ मध्ये इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर असताना संपूर्ण मालिकेत, इंग्लंडच्या संघाने विराट कोहलीला फलंदाजी करताना  स्लेजिंग केल्याची कबुलीच निक कॉम्पटनने दिली आहे. 

क्रिकेट सामन्यांच्या वेळेस करण्यात येणाऱ्या स्लेजिंगवर आजपर्यंत अनेक खेळाडूंनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना विरोधी गटातील अनेक खेळाडूंनी स्लेजिंग केल्याचा कबुलीजबाब अनेकांनी दिलेला आहे. तसाच काहीसा खुलासा इंग्लंडचा माजी खेळाडू निक कॉम्पटनने विराट कोहली संदर्भात केला आहे. २०१२ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असताना आपली भेट विराट कोहलीच्या गर्लफ्रेंड सोबत झाल्याचे सांगत, या भेटीत तिच्याशी बोलल्याचे निक कॉम्पटनने म्हटले आहे.

सामन्यांना सुरवात होण्याआधी आपण, केव्हिन पीटरसन आणि युवराज सिंग बाहेर असताना ही भेट झाल्याचे निक कॉम्पटनने सांगितले आहे. मात्र यानंतर सामना सुरु झाल्यावर आपण जेंव्हा फलंदाजीसाठी मैदानात येत असे, त्याच वेळेस विराट कोहली काही तरी कंमेंट करायचा. कदाचित विराटला ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगायचे होते. किंवा एक्स गर्लफ्रेंड असल्याचे म्हणायचे होते व आपण तिच्याशी बोलल्याचे विराटला आवडले नसावे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने स्लेजिंग म्हणून याच गोष्टीचा वापर विराटला बाद करण्यासाठी केल्याचा खुलासा निक कॉम्पटनने केला आहे. पण विराट उत्तम आणि आक्रमक फलंदाज असल्यामुळे या स्लेजिंगचा डाव उलटा पडल्याचे निकने सांगितले. विराटने चांगली खेळी साकारत शतक झळकावल्याचे निक कॉम्पटन म्हणाला.

याप्रमाणेच अनेक लहान गोष्टी या सामन्यांच्या वेळेस घडल्याचे निक कॉम्पटनने म्हटले आहे. शिवाय ऍलिस्टर कुकच्या खेळामुळेच ही मालिका २ - १ ने इंग्लंडने जिंकल्याचे निक म्हणाला. दरम्यान यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी  विराट कोहलीला स्लेजिंग करणे अधिकच धोकादायक असल्याचे म्हटले आहे.      
 

 

 


​ ​

संबंधित बातम्या