संधी गमावल्या पण पश्चाताप नाही : कोहली

वृत्तसंस्था
Wednesday, 12 September 2018

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा निकाल 1-4 असा लागला असला तरी आम्ही फार वाईट खेळ केला नाही असे म्हणत भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघाची पाठराखण केली आहे. 

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा निकाल 1-4 असा लागला असला तरी आम्ही फार वाईट खेळ केला नाही असे म्हणत भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघाची पाठराखण केली आहे. 

ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावरील अखेरच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला, ''मालिकेच्या 1-4 निकालाचे पूर्ण श्रेय इंग्लंडच्या संघाला द्यायला हवे. त्यांनी प्रत्येक सामन्यात उत्तम खेळ केला. मात्र भारतीय संघानेसुद्धा प्रत्येक सामन्यात चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आम्ही खेळलेले क्रिकेट कदाचित धावफलकावर उमटले नसेल मात्र दोन्ही संघांसाठी ही मालिका स्पर्धात्मक होती यांची दोन्ही संघाना खात्री आहे. आम्ही संधी नक्कीच गमावल्या पण इंग्लंड दौऱ्याबद्दल अजिबात पश्चाताप नाही.''

इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमुळे कसोटी क्रिकेटचे महत्व वाढण्यास मदत झाली असेही त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, '' दोन्ही संघ केवळ जिंकण्याच्याच ईर्षेने खेळतात तेव्हा चाहते नक्कीच कसोटी सामने पाहतात. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड हा एक कसलेला संघ आहे त्यामुळे दोन्ही संघाने सामना बरोबरीत सोडण्यासाठी कधीच खेळ केला नाही.''

सामन्याच्या अखेरच्या दिवशी शतक झळकावलेल्या लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांचे कौतुक करताना तो म्हणाला, ''राहुल आणि रिषभ यांचे कौतुक व्हायलाच हवे. त्या दोघांचाही खेळ पाहून मला प्रचंड आनंद झाला. भविष्यात भारतीय संघासाठी हे दोघे फार चांगली कामगिरी करतील याची मला खात्री आहे.''

संबंधित बातम्या