माझ्या फॉर्मची चिंता नको : विश्‍वनाथन आनंद 

वृत्तसंस्था
Sunday, 16 September 2018

भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. यापूर्वी आनंद 2006 मध्ये या स्पर्धेत भारताकडून खेळला होता. आनंद 1984 ते 1992 आणि 2004, 2006 अशा एकूण पाच ऑलिंपियाडमध्ये खेळला आहे. 

कोलकता : माजी जगज्जेता विश्‍वनाथन आनंद याच्या समावेशामुळे अपेक्षा उंचावलेला भारतीय बुद्धिबळ संघ 43व्या चेस ऑलिंपियाडसाठी सज्ज झाला आहे. येत्या रविवारपासून (ता. 23) ही स्पर्धा जॉर्जियात बाटुमी येथे सुरू होत असून, भारतीय संघ गुरुवारी (ता. 20) रवाना होणार आहे. 

भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. यापूर्वी आनंद 2006 मध्ये या स्पर्धेत भारताकडून खेळला होता. आनंद 1984 ते 1992 आणि 2004, 2006 अशा एकूण पाच ऑलिंपियाडमध्ये खेळला आहे. 

आनंदचा फॉर्म सध्या चांगला नाही. पण, त्याची उपस्थितीदेखील महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्या कामगिरीकडे तज्ज्ञांच्या नजरा नक्की लागून असतील. आनंद म्हणाला, ""ऑलिंपियाड न खेळण्यास फार मोठे कारण नाही. अन्य स्पर्धा कार्यक्रमांत व्यग्र राहिल्यामुळे मी ही स्पर्धा खेळत नव्हतो. मी पुन्हा खेळण्यास तयार का झालो, यालादेखील खास कारण नाही. सराव आणि महासंघाने सहकार्य केल्यामुळे मी खेळण्याचा निर्णय घेतला. माझा फॉर्म चांगला नसला, तरी त्याची फारशी चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येक खेळाडूला या स्थितीतून जावे लागते. तसा मी जात आहे. कुणीच प्रदीर्घ सातत्य टिकवू शकत नाही.'' 

संघातील चांगल्या वातावरणाचाही खूप फरक पडतो, असे सांगून आनंद म्हणाला, ""पी. हरिकृष्णा, विदीत गुजराथी, बी. अभिनंदन, के. शशिकिरण असे सक्षम खेळाडू संघात आहेत. संघातील वातावरणाचाही कामगिरीवर खूप परिणाम होतो. आम्ही या स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी करू, असा मला विश्‍वास आहे.'' 

स्पर्धेच्या तयारीविषयी आनंद म्हणाला, ""ऑलिंपियाड हा वैयक्तिक स्पर्धेपेक्षा वेगळा खेळ आहे. मी माझ्या पटावर निश्‍चितच सर्वोत्तम कामगिरी करेन. पण, जर संघातील अन्य खेळाडूदेखील चांगली कामगिरी करीत असतील, तर माझी आणि माझ्यामुळे त्यांची कामगिरी चांगली होईल. सांघिक स्पर्धेत एकमेकांवर बरेच अवलंबून असते. प्रत्येकाने शंभर टक्के योगदान द्यायला हवे.'' 

जगज्जेतेपदाच्या लढतीचे आकर्षण 
आनंदला नोव्हेंबरमध्ये मॅग्नस कार्लसन आणि फॅबिआनो कॅरुआना यांच्यात होणाऱ्या जागतिक लढतीचेही आकर्षण आहे. ही लढत अत्यंत चुरशीची होईल. कोण जिंकेल, याचा अंदाज आतापासून मांडणे योग्य नाही. कुठल्याही क्षणी लढतीचे चित्र पालटू शकते एवढे दोघेही तोडीसतोड खेळाडू आहेत. या लढतीची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे, असेही आनंद म्हणाला. 

संबंधित बातम्या