विराटचा वर्कलोड

शैलेश नागवेकर
Sunday, 2 September 2018

सचिन तेंडुलकर अवघा एकच ट्वेन्टी-२० सामना खेळला होता तरिही निवृत्तीकडे झुकलेला असताना तो प्रामुख्याने एकदिवसीय सामन्यांबाबत सिलेक्टिव  होता. निवडक सामन्यांमध्ये खेळून तो विश्रांतीवर अधिक भर द्यायचा, परंतु विराट कोहलीवर आताच निवडक सामन्यात खेळण्याची वेळ आली. भारताचे वाढलेले क्रिकेट सामने आता प्रमुख खेळाडूंना त्रासदायक होऊ लागल्याचे हे द्योतक आहे. 

सचिन तेंडुलकर अवघा एकच ट्वेन्टी-२० सामना खेळला होता तरिही निवृत्तीकडे झुकलेला असताना तो प्रामुख्याने एकदिवसीय सामन्यांबाबत सिलेक्टिव  होता. निवडक सामन्यांमध्ये खेळून तो विश्रांतीवर अधिक भर द्यायचा, परंतु विराट कोहलीवर आताच निवडक सामन्यात खेळण्याची वेळ आली. भारताचे वाढलेले क्रिकेट सामने आता प्रमुख खेळाडूंना त्रासदायक होऊ लागल्याचे हे द्योतक आहे. 

मुळात क्रिकेटचा अतिरेक हा भारतासाठी नवा नाही, प्रत्येक मोसमागणिक सामन्यांची संख्या वाढत आहे. जवळपास वर्षभरापूर्वी विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांनी बीसीसीआयकडे व्यथा मांडली. त्यावेळी सामने कमी करण्यापेक्षा यातून सुवर्णमध्य काढण्याचे आश्वास दिले गेले.  सामने तर कमी होऊ शकत नाही. करोडो रुपयांचे प्रायोजकत्व देणाऱ्या आणि सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी करोडो रुपये देऊन हक्क मिळवणाऱ्या कंपन्या सामन्यांची संख्या कशी काय कमी होऊ देणार?  बीसीसीआयचेही हात बांधलेले असताना सुवर्णमध्याच्या तोडग्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर टीएफटी म्हणजेच भविष्यातील पाच वर्षांचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा सर्वाधिक सामने खेळणार असलेल्या देशात भारताचा वरचा क्रमांक ठरला होता. 

तसे पहायला गेले तर भारतासह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे देशही सातत्याने खेळत असतात, न्यूझीलंडसारखा देश अधून मधून खेळत असतो त्यामुळे त्यांच्याकडे `वर्क`च कमी असते त्यामुळे `लोड` येण्याचा प्रश्नच येत नसतो. असो, मुख्य मुद्दा असा की, इंग्लंड-ऑस्ट्रेलियासारखे देश यातून कसा मार्ग काढतात याचा. या दोन्ही देशांच्या संघांकडे पाहिले तर कसोटी आणि मर्यादित षटकांचे असे त्यांचे दोन संघ असतात दोन-तीन खेळाडू तिन्ही प्रकारात खेळत असतात आपल्याकडेही आता रोटेशनचा विचार होऊ लागला आहे, पण तुमचे क्रिकेट विकायचे तर विराटसारखा ब्रँड हवाच !! येथेच खरी गंमत आहे.

मी सुद्धा माणूस आहे... 
मी सुद्धा माणूस आहे, जखम झाली तर रक्तच बाहेर येईल मी मशिन नाही, मलाही विश्रांतीची गरज लागते. असे विराट काही महिन्यांपूर्वी काहीशा उद्वेगाने म्हणाला होता. तेवढेच कशाला, लग्न करायला त्याच्याकडे वेळ नव्हता संसार कधी करायचा हा प्रश्न त्याच्याकडे होता. आठवत असेल तर बघा,  मायदेशातील श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून त्याने माघार घेतली आणि लग्नाची बार उडवला. त्यानंतर दिल्लीत पहिले आणि मुंबईत दुसरे रिसेप्शन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी तो दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेवर निघाला. त्यानंतर आयपीएल मध्ये खेळला. 

अफगाणीस्थानविरुदधच्या एकमेव सामन्यातून माघार आणि आता जून महिन्यापासून इंग्लंड दौरा. विश्रांती तर सोडाच संसार कधी करणार ? शिखर धवन,  हार्दिक पंड्या आणि केएल राहुलसारखे खेळाडू जून महिन्यात लंडनला गेले आहेत ते आता तेथून थेट दुबईला जातील आणि या महिन्याच्या अखेरीस मायदेशात येईतल. म्हणजेच चार महिने घराबाहेर ? असे आणि एवढे क्रिकेट फारच होतेय जरा. ही गाडी एवढ्यावरच थांबत नाही. मायदेशात परतल्यावर म्हणजेच ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीजविरुदधची मालिका त्यानंतर डिसेंबर-जानेवारीत श्रीलंका दौरा आणि जानेवारी-फेब्रुवारीत ऑस्ट्रेलिया दौरा. तेथून परतल्यावर मार्च-एप्रिलमध्ये आयपीएल आणि आयपीएल संपताच पुन्हा जून-जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्डकप आपल्याला वाचताना दम लागू शकतो पण विराटसारख्या खेळाडूंची काय अवस्था होत असेल याचा विचारच केलेला बरा. विराट त्याच्या डायट आणि व्यायामाबाबत फारच काटेकोर आहे. तरिही आता छोट्या छोट्या दुखापतींच्या कुरबुरी सुरु झाल्या आहेत आताच जर लक्ष दिले नाही तर मोठ्या दुखापतींचे संकट उभे राहू शकते. 

विराट तुझी भारतीय क्रिकेटला गरज आहे....बीसीसीआयला सातत्याने खेळण्याचा किती कार्यक्रम तयार करायचा आहे तो करु दे तु मात्र तुझी काळजी घे..

जून 2017 ते जून 2019 या दोन वर्षांत किती सामने झाले आणि किती खेळले जाणार आहे याची आकडेवारी. यावरून भारतीय संघ सातत्याने किती खेळत आहे हे सिद्ध होते.

 -जून 2017 : चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंड
 -जून - जुलै 2017 : वेस्ट इंडीज दौरा
 -जुलै-ऑगस्ट 2017 : श्रीलंका दौरा
 -सप्टेंबर 2017 : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशात मालिका
 -ऑक्टोबर 2017 : न्यूझीलंडविरुद्धची मायदेशात मालिका
 -नोव्हेंबर-डिसेंबर 2017 : मायदेशात श्रीलंकेविरुद्धची मालिका
 -जानेवारी -फेब्रुवारी 2018 : दक्षिण आफ्रिका दौरा
 -मार्च- एप्रिल 2018 : आयपीएल
 -जून ते सप्टेंबर 2018 : इंग्लंड दौरा (सुरु आहे)
 - सप्टेंबर 2018 : आशिया करंडक
 -ऑक्टोबर -नोव्हेंबर 2018 : वेस्ट इंडिजचा भारत दौरा
 -डिसेंबर 2018 जानेवारी 2018 : ऑस्ट्रेलिया दौरा
 -फेब्रुवारी -मार्च 2019 : ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (वन डे आणि टी-20)
 -मार्च -एप्रिल 2019 : आयपीएल
 -जून 2019 : विश्वकरंडक (इंग्लंड)


​ ​

संबंधित बातम्या