World Cup 2019 : सलामीच्या जोडीची भूमिका महत्त्वाची; कोहलीने थोपटली रोहित-शिखरची पाठ 

सुनंदन लेले
Tuesday, 11 June 2019

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मिळवलेल्या दमदार विजयाचा क्रिकेट रसिकांवर आणि जाणकारांवर चांगलाच प्रभाव पडला आहे. एक परिपूर्ण सामना भारतीय संघाने आत्मविश्वासाने खेळून दाखवला, याची चर्चा रंगत आहे

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मिळवलेल्या दमदार विजयाचा क्रिकेट रसिकांवर आणि जाणकारांवर चांगलाच प्रभाव पडला आहे. एक परिपूर्ण सामना भारतीय संघाने आत्मविश्वासाने खेळून दाखवला, याची चर्चा रंगत आहे. कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना गोलंदाजांचे आणि हार्दिक पंड्याच्या तोडफोड खेळीचे कौतुक करताना विजयाचे मुख्य श्रेय भारताच्या सलामीच्या जोडीला दिले. 

रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, "भारतीय संघाचे नशीब चांगले आहे की, रोहित शर्मा आणि शिखर धवनसारखी तगडी जोडी सलामी करत आहे. फार कमी वेळा अशी स्थिरावलेली जोडी दीर्घ काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर बघायला मिळते. 2013 पासून शिखर धवन - रोहित शर्मा भारतीय एकदिवसीय आणि टी-20 संघाकरिता सलामी करत आहेत. त्यांची तंदुरुस्ती जबरदस्त आहे. फार क्वचित त्यांनी दुखापतीने सामना चुकवला आहे. मला आवडते ती गोष्ट म्हणजे दोघेही जम बसल्यावर मोठी खेळी उभारतात. एकमेकांच्या शैलीची त्यांना उत्तम जाण आहे. कोणाला सामन्यात लय सापडली, हे जाणून दोघे खेळत आहेत. ऑस्ट्रेलियासमोरच्या सामन्यात त्यांनी पहिल्या एका तासात जो खेळ केला, तो सामन्याला दिशा देणारा ठरला आहे.'' 

रोहित शर्मा - शिखर धवनच्या जोडीची स्तुती नुसती विराट कोहलीनेच केली असे नाही, तर ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच यानेही केली. तो म्हणाला, "खूप अनुभव आहे या जोडीला. दोघेही तगडे फटकेबाज आहेत. रविवारच्या सामन्यात पहिल्या 10 षटकांत दोघांनी अहंकार बाजूला ठेवून परिपक्व फलंदाजी केली. भारतीय संघाला चांगली सलामी मिळाल्यावर मोठ्या धावसंख्येपासून त्यांना रोखणे आम्हाला कठीण गेले.'' 

भागीदारीचा विक्रम खुणावतोय 
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना आता भागीदारीचा विक्रम खुणावतोयं. दोघांनी आतापर्यंत सहा शतकी भागीदारी करताना 1273 धावा एकत्र कुटल्या आहेत, जो अर्थातच विक्रम आहे. त्यांनी हेन्स - ग्रिनीज जोडीलाही मागे टाकले आहे. रोहितने फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावांचा टप्पा पार केलाय. शिखर धवन - रोहित शर्माने मिळून 16 शतकी भागीदाऱ्यांची नोंद केलीय म्हणजेच गांगुली- तेंडुलकरच्या 21 शतकी भागीदाऱ्यांच्या विक्रमाच्या ते जवळ आहेत.


​ ​

संबंधित बातम्या