विनेश फोगटची शिबिरातून माघार ; कुस्तीगीर पूजा धांदा, साक्षी मलिकचा लखनौला विरोध
अव्वल महिला कुस्तीगीर विनेश फोगटने राष्ट्रीय कुस्ती शिबिरात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
नवी दिल्ली : अव्वल महिला कुस्तीगीर विनेश फोगटने राष्ट्रीय कुस्ती शिबिरात सहभागी होण्यास नकार दिला आहे. पूजा धांदा हिनेही यास विरोध केला आहे. तर ऑलिंपिक ब्रॉंझ विजेत्या साक्षी मलिकने शिबिर लखनौऐवजी सोनीपतला घेण्याची सूचना केली आहे.
भारतीय कुस्ती महासंघ सरावातील खेळाडूंसह कुस्ती शिबिर ऑगस्टच्या मध्यापासून घेण्याचा विचार करीत आहे. पुरुषांचे शिबिर सोनीपतला, तर महिलांचे शिबिर लखनौला घेण्याचे ठरवले होते. ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी हे शिबिर सर्वांना सक्तीचे असेल, असेही सांगितले होते. त्यानंतर देशातील अव्वल कुस्तीगीर विनेशने शिबिरात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम
विनेशने ऑलिंपिकची पात्रता मिळवताना जागतिक स्पर्धेत पदक जिंकले होते. सलग दोन ऑलिंपिकला पात्र ठरलेली भारताची पहिली महिला कुस्तीगीर आहे. "मी शिबिरात सहभागी होणार नाही. मी हे महासंघासही कळवले आहे. शिबिरात असताना मी तेथील काहीही खात नाही. ते खाल्ल्यास मला अपचनाचा त्रास होतो. मी बाहेरून काही तरी मागवते किंवा बाहेर जाऊन खाते. सध्याच्या शिबिरात हे शक्य नाही. त्यामुळे शिबिरापासून दूर राहणेच चांगले,'' असे विनेशने सांगितले.
कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. लखनौतही हेच घडत आहे. आगामी काही महिन्यात कोणतीही स्पर्धाही होणार नाही. त्या वेळी धोका कशाला हवा? कुस्ती महासंघ आमचे प्रश्न समजून घेईल, अशी आशा पूजाने व्यक्त केली. साक्षी मलिकने शिबिर लखनौला घेण्याऐवजी सोनिपत अथवा पतियाळास घेता येईल. एवढा दूरचा प्रवास कशाला करायचा, त्यात धोका आहे, असे साक्षीने सांगितले.