नव्या बॅटींग कोचने आल्या आल्याच केला पंतचा पत्ता कट

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून आपल्या फलंदाजी प्रशिक्षक या नव्या इनिंगला सुरवात करणाऱ्या विक्रम राठोड यांनी आपल्यासमोर सलामीची जोडी आणि एकदिवसीय सामन्यातील मधल्या फळीची कामगिरी सुधारणे याला प्राधान्य असेल, असे मत शुक्रवारी व्यक्त केले. 

नवी दिल्ली : आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून आपल्या फलंदाजी प्रशिक्षक या नव्या इनिंगला सुरवात करणाऱ्या विक्रम राठोड यांनी आपल्यासमोर सलामीची जोडी आणि एकदिवसीय सामन्यातील मधल्या फळीची कामगिरी सुधारणे याला प्राधान्य असेल, असे मत शुक्रवारी व्यक्त केले. 

"बीसीसीआय'ने भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी विक्रम राठोड यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केल्यानंतर राठोड यांनी आपली मत "बीसीसीआय'च्या संकेतस्थळावर मांडली. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या टी 20 मालिकेने राठोड आपली दुसरी इनिंग सुरू करणार आहेत. 

राठोड म्हणाले,"एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीला अपयश येत आहे. यामागची कारणे शोधून तो सोडवला पाहिजे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीचा प्रश्‍न पुन्हा डोके वर काढत आहे. आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत आणि स्पर्धाही तगडी आहे. या दोन्ही आघाड्यांवर सातत्य कसे राखता येईल हे शोधण्याचे आव्हान आहे.'' 

उपलब्ध असलेल्या पर्यायांची अचूक निवड करून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सांगून राठोड म्हणाले,""गुणवत्तेचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम पातळीवर योग्य वेळी संदी मिळायला हवी. त्यांना प्रोत्साहन देऊन तयारीसाठी योग्य सुविधा आणि वेळ देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे भरपूर गुणवत्ता आहे. फक्त ती योग्य प्रकारे प्रदर्शित कशी होईल यावर काम करायचे आहे. जेणे करून ते प्रदिर्घ काळ संघात राहू शकतील.'' 

कारकिर्दीत सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळलेले राठोड म्हणाले,""सर्व खेळाडूंसाठी आमच्याकडे कार्यक्रम आहे. प्रत्येक प्रशिक्षकाला भारतीय क्रिकेटचा चांगला अभ्यास आहे. मी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिल्याने मला खेळाडूंची माहिती आहे. त्यांच्याबरोबर काही काळ काम केले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, कर्णधार विराट कोहली या सर्वांबरोबर मी यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी माझा चांगला समन्वय आहे. आता हे संबंध एक पाऊल पुढे टाकून पुढच्या स्तरावर न्यायचे आहेत.'' 

राठोड म्हणाले.... 
-एकदिवसीय क्रिकेटसाठी श्रेयस अय्यर, मनीष पांडे हे सर्वोत्तम पर्याय 
-देशांतर्गत तसेच अ संघाकडून दोघांच्या कमगिरीत सातत्य 
-प्रशिक्षक म्हणून जबाबदारी मोठी, फलंदाजांना सर्वोतोपरी मदत करणार 
-खेळाडूंची मते जाणून घेऊन त्यांच्या कलानुसार त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणार 
-चुकांमधून शिकायचे असते ही जाणीवर खेळाडूंच्या मनात निर्माण करायची


​ ​

संबंधित बातम्या