Asian Games 2018 : विकासचे सुवर्ण स्वप्न राहिले अर्धवट

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे बॉक्सर विकास कृष्णनचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने उपांत्य फेरीतून माघार घेतली. त्यामुळे त्याला ब्रॉंझ पदकावरच समाधान मानावे लागले. 

जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे बॉक्सर विकास कृष्णनचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने उपांत्य फेरीतून माघार घेतली. त्यामुळे त्याला ब्रॉंझ पदकावरच समाधान मानावे लागले. 

उपांत्य फेरीत विकाससमोर कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखानचे आव्हान होते, परंतु विकासने माघार घेतल्याने अबिलखानला पुढे चाल देण्यात आली. पुरुषांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून विकासने भारतासाठी एक पदक निश्चित केले. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली. 

विकासने आठ वर्षांपूर्वी ग्वांझाऊ येथे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2014 मध्ये आणि आता 2018 मध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  
आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये विकासने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या एर्बिक तांगलातीहानविरूद्ध विकासच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यातही त्याने विजय मिळवला होता. मात्र, उपांत्य फेरीपूर्वी दुखापत बरी न झाल्याने त्याला माघार घ्यावी लागली.


​ ​

संबंधित बातम्या