पंड्या, राहुलऐवजी शुभमन गिल, विजय शंकर भारतीय संघात

वृत्तसंस्था
Sunday, 13 January 2019

भारतीय संघात निवड होण्याची शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यंदाच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शुभमन गिलने धडाकेबाज कामगिरी केली आहे. केवळ 9 सामन्यांमध्ये गिलने 1 हजार धावा केल्या आहेत.

नवी दिल्ली : महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशी सामोरे जाईपर्यंत संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांच्याऐवजी भारतीय संघात शुभमन गिल आणि विजय शंकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह विधाने केले होते, ज्यामुळे बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर कारवाई करुन त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी बोलावून घेतले होते. या दोन्ही खेळाडूंच्या जागी गिल आणि विजय शंकरची संघात निवड करण्यात आलेली आहे. बीसीसीआयने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ऍडलेड येथे 15 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्याआधी विजय शंकर ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तर शुभमन गिल हा न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघात सहभागी होईल. 

भारतीय संघात निवड होण्याची शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यंदाच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शुभमन गिलने धडाकेबाज कामगिरी केली आहे. केवळ 9 सामन्यांमध्ये गिलने 1 हजार धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली होती. तो भारताच्या 19 वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा सदस्य होता. विजय शंकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. भारतीय निवड समितीने आगामी विश्वकरंडक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून संघबांधणीस सुरवात केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या