विदर्भ मुलींचा दुसरा विजय; दिशा कासटचे नाबाद अर्धशतक 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 April 2019

गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार दिशा कासटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर यजमान विदर्भाने सातव्या साखळी सामन्यात त्रिपुराचा सहा गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला. 

नागपूर, ता. 3 : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार दिशा कासटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर यजमान विदर्भाने सातव्या साखळी सामन्यात त्रिपुराचा सहा गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला. 

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर विदर्भाच्या गोलंदाजांनी त्रिपुराला 50 षट्‌कांत 9 बाद 113 धावांवरच रोखून धरले. त्यानंतर विदर्भाने 114 धावांचे माफक विजयी लक्ष्य 33.4 षटकांत केवळ चार गडी गमावून लीलया गाठले. दिशाने आठ चौकारांसह 67 चेंडूंत नाबाद 55 धावा फटकावल्या. सलामीवीर अंकिता भोंगाडेने 19 व लतिका इनामदारने 17 धावा काढून विजयास हातभार लावला. गोलंदाजीत वैष्णवी खंडकरने दोन गडी बाद केले. त्रिपुराकडून एस. चक्रवर्तीने नाबाद 34, एम. रबिदासने 33 व कर्णधार आर. साहाने 20 धावा केल्या. सात सामन्यांमध्ये आठ गुणांची कमाई करणाऱ्या विदर्भाचा शेवटचा साखळी सामना येत्या पाच एप्रिलला दिल्लीविरुद्ध याच मैदानावर खेळला जाणार आहे. विदर्भ बादफेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाद झाला आहे. 

संक्षिप्त धावफलक : त्रिपुरा : 50 षटकांत 9 बाद 113 (एस. चक्रबर्ती नाबाद 34, एम. रबिदास 33, आर. साहा 20, वैष्णवी खंडकर 2-32, गौरी वानकर 1-12, दिशा कासट 1-18, नूपुर कोहळे 1-25, मीनाक्षी बोडखे 1-18). विदर्भ : 33.4 षटकांत 4 बाद 114 (दिशा कासट नाबाद 55, अंकिता भोंगाडे 19, लतिका इनामदार 17, पूजा दास 2-47, एम. रबिदास 2-24).


​ ​

संबंधित बातम्या