विदर्भ मुलांना ऐतिहासिक विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 March 2019

फिरकीपटू पार्थ रेखडेच्या अचूक माऱ्यानंतर यष्टीरक्षक पवन परनाते व नयन चव्हाणच्या शतकी भागीदारीच्या जोरावर विदर्भाने अंतिम सामन्यात दिल्लीचे आव्हान चार गड्यांनी सहज मोडीत काढून विजेतेपदावर नाव कोरले.

नागपूर : विदर्भाने गेल्यावर्षी इंदूर येथे सर्वप्रथम रणजी विजेतेपद मिळविले, त्यावेळी दिल्लीचा संघ प्रतिस्पर्धी होता. त्याचप्रमाणे विदर्भाच्या 23 वर्षांखालील मुलांच्या संघाने हैदराबाद येथे शुक्रवारी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकावले, त्यावेळीही प्रतिस्पर्धी संघ दिल्लीच होता. हा निव्वळ योगायोग असला तरी या विजेतेपदामुळे व्हीसीएच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

फिरकीपटू पार्थ रेखडेच्या अचूक माऱ्यानंतर यष्टीरक्षक पवन परनाते व नयन चव्हाणच्या शतकी भागीदारीच्या जोरावर विदर्भाने अंतिम सामन्यात दिल्लीचे आव्हान चार गड्यांनी सहज मोडीत काढून विजेतेपदावर नाव कोरले. 

हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर दिल्लीने विजयासाठी दिलेले 212 धावांचे लक्ष्य विदर्भाने 48.2 षट्‌कांत सहा गडी गमावून सहज पूर्ण केले. कारकीर्दीतील अविस्मरणीय खेळी करणाऱ्या पवनने सहा चौकारांसह 132 चेंडूंत नाबाद 88 धावा काढून विजयात निर्णायक योगदान दिले. नयनने चार चौकारांसह 65 चेंडूंत 48 धावा काढल्या. याशिवाय कर्णधार काळेने 40 चेंडूंत 29 आणि अष्टपैलू दर्शन नळकांडेने दोन चौकार व तेवढ्याच षट्‌कारांसह 15 चेंडूंत नाबाद 24 धावांचे योगदान देऊन विजयास हातभार लावला.

सलामीवीर अथर्व तायडे (5) व फॉर्ममध्ये असलेला अक्षय दुल्लरवार (12) 25 धावांत तंबूत परतल्यानंतर पवन व नयनने तिसऱ्या गड्यासाठी 103 धावांची निर्णायक भागीदारी करून विजयाचा भक्‍कम पाया रचला. विदर्भाला 12 चेंडूत 15 धावांची गरज असताना दर्शन नळकांडेने आयुष बदोनीच्या गोलंदाजीवर एक षटकार आणि चौकार खेचून विदर्भाचा विजय निश्‍चित केला. दर्शननेच विजयी चौकार मारला. 

कर्णधार मोहित काळेने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीला गोलंदाजांनी अवघ्या 211 धावांत रोखून धरले. 50 धावांत आघाडी फळीतील तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर दिल्लीचा संघ या धक्‍क्‍यातून शेवटपर्यंत सावरला नाही. त्यानंतर दिल्लीचे फलंदाज एकापाठोपाठ नियमित अंतराने बाद होत केले. सर्वाधिक 65 धावा (82 चेंडू, 6 चौकार, 1 षट्‌कार) कर्णधार ललित यादवने काढल्या. सुमीत कुमारने 52 (66 चेंडू, 4 चौकार) आणि वैभव कंडपालने 39 धावांचे (58 चेंडू, 3 चौकार) योगदान दिले. विदर्भाकडून डावखुरा फिरकीपटू पार्थ रेखडेने 33 धावांमध्ये सर्वाधिक चार गडी बाद केले. विदर्भाचे विविध वयोगटांमध्ये या मोसमातील हे चौथे, तर एकूण आठवे विजेतेपद होय. याआधी 16 वर्षांखालील मुलांची विनू मंकड चषक, रणजी करंडक आणि इराणी करंडक जिंकला होता. 

संक्षिप्त धावफलक 
दिल्ली : 50 षट्‌कांत सर्वबाद 211
(ललित यादव 65, सुमीत माथुर 52, वैभव कंडपाल 39, आयुष बदोनी 15, लक्ष्य 10, पार्थ रेखडे 4-33, नचिकेत परांडे 2-38, दर्शन नळकांडे 1-46, राज चौधरी 1-27, अथर्व देशपांडे 1-36). विदर्भ : 48.2 षट्‌कांत 6 बाद 215 (पवन परनाते नाबाद 88, नयन चव्हाण 48, मोहित काळे 29, दर्शन नळकांडे नाबाद 24, अक्षय दुल्लरवार 12, कुलदीप यादव 4-37, अभिषेक वत्स 1-27, योगेश शर्मा 1-29). 

विदर्भाचे आतापर्यंतचे विजेतेपद 

  • 2018-19 : 23 वर्षांखालील चषक 
  • 2018-19 : इराणी करंडक 
  • 2018-19 : रणजी करंडक 
  • 2018-19 : विनू मंकड करंडक 
  • 2017-18 : कुचबिहार करंडक 
  • 2017-18 : इराणी करंडक 
  • 2017-18 : रणजी करंडक 
  • 2016-17 : विजय मर्चंट करंडक

​ ​

संबंधित बातम्या