विरोधांच्या लाटांवर आरूढ होत वर्षा-श्‍वेताचे रौप्यपदक 

संजय घारपुरे
Saturday, 1 September 2018

सेलिंगमधील भारतीय पदके 
- वर्षा-श्‍वेताचे महिलांच्या 49 ईआर एफएक्‍स प्रकारात रौप्यपदक 
- भारतीय जोडीचे 40 निव्वळ दोषांक, तर सुवर्णपदक विजेत्या सिंगापूर जोडीचे 14 
- 20 वर्षीय वर्षा सोशॉलॉजीची विद्यार्थिनी, तर श्‍वेता खारघरच्या येरळा मेडिकल ट्रस्ट कॉलेजची विद्यार्थिनी 
- हर्षिता तोमरला ओपन लेसर गटात ब्रॉंझ, तिचे 62 दोषांक 
- याच शर्यतीत गोविंद बैरागी चौथा 
- पुरुषांच्या 49 ईआर शर्यतीत वरुण ठक्कर-गणपती चेंगप्पा यांना ब्रॉंझ 
- भारतीय जोडीचे 43 दोषांक, तर रौप्य विजेत्या कोरिया जोडीचे 42.5 
- लेसर रेडियलमध्ये नेत्रा कुमानन पाचवी 

मुंबई : आशियाई क्रीडा सेलिंग स्पर्धेच्या निवड चाचणीत सरस कामगिरी केल्यानंतरही वर्षा गौतम आणि श्‍वेता शेवरेगार यांना जाकार्ता आशियाई क्रीडा सेलिंग स्पर्धेसाठी प्रवेश नाकारला गेला होता. त्यानंतर आपल्याच पालक संघटनेस न्यायालयात खेचत वर्षा-श्‍वेताने भारतीय संघात स्थान मिळवले आणि एवढेच नव्हे तर न्यायालयीन लढाईतून जास्तच प्रेरणा घेत रौप्यपदकही जिंकले. 

चेन्नईची वर्षा आणि मुंबईतील माझगावची असलेली श्‍वेता यांचे रौप्यपदक म्हणजे पदकाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी किती लढावे लागते हेच सांगणारी आहे. त्यामुळेच श्‍वेताने, अनेक विरोधाच्या लाटा आल्या, तरी आम्ही त्यावर मात केली. कामाचे योग्य प्रकारे वाटप करीत आमचे लक्ष्य साधले. या रौप्यपदकाने आम्ही दिलेला लढा योग्यच होता हे सिद्ध झाले याचे समाधान जास्त आहे, असे जाकार्ताहून "सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. 

बोटही नाकारली होती 
राष्ट्रीय स्पर्धा सहभागासाठी वर्षा-श्‍वेताला बोटही नाकारली गेली होती. त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी 12 लाख खर्च करून बोट विकत घेतली. जाकार्ता येथेच झालेल्या आशिया स्पर्धेसाठी निवड चाचणी जाहीर झाली. त्यात त्यांनी दुसरा क्रमांक मिळविला; मात्र जाकार्तातील आशियाई स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकताना राष्ट्रीय, तसेच निवड चाचणीत अव्वल ठरलेल्या एकता यादव-शैला चार्ल्स या जोडीला मागे टाकले. मात्र, यॉटिंग संघटनेने राष्ट्रीय विजेत्या जोडीला पसंती देण्याचे ठरवले. त्या विरोधात वर्षाने थेट दिल्ली न्यायालयात दाद मागितली. 

स्पर्धेला जास्त वेळ नव्हता, त्यामुळे वर्षा न्यायालयात लढत असताना मी स्पर्धेसाठी आवश्‍यक असलेले होमवर्क पूर्ण करण्याकडे; तसेच बोट स्पर्धेसाठी सज्ज कशी राहील, याकडेही लक्ष दिले. संधी मिळताच चेन्नईला जाऊन एकत्रित सराव करीत होतो, अखेर सर्व घडामोडीनंतर पूर्ण सरावावरच भर दिला, असे श्‍वेताने सांगितले. अर्थात, आम्हाला संयोजक भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून बदललेली प्रवेशिका स्वीकारणार की नाही, याची शंका होतीच; पण त्याचा विचार न करता आम्ही आमचे काम करीत राहिलो, असेही श्‍वेता म्हणाली. 

सेलिंगमधील भारतीय पदके 
- वर्षा-श्‍वेताचे महिलांच्या 49 ईआर एफएक्‍स प्रकारात रौप्यपदक 
- भारतीय जोडीचे 40 निव्वळ दोषांक, तर सुवर्णपदक विजेत्या सिंगापूर जोडीचे 14 
- 20 वर्षीय वर्षा सोशॉलॉजीची विद्यार्थिनी, तर श्‍वेता खारघरच्या येरळा मेडिकल ट्रस्ट कॉलेजची विद्यार्थिनी 
- हर्षिता तोमरला ओपन लेसर गटात ब्रॉंझ, तिचे 62 दोषांक 
- याच शर्यतीत गोविंद बैरागी चौथा 
- पुरुषांच्या 49 ईआर शर्यतीत वरुण ठक्कर-गणपती चेंगप्पा यांना ब्रॉंझ 
- भारतीय जोडीचे 43 दोषांक, तर रौप्य विजेत्या कोरिया जोडीचे 42.5 
- लेसर रेडियलमध्ये नेत्रा कुमानन पाचवी 


​ ​

संबंधित बातम्या