धाडसी बना अन्‌ करिअर घडवा

उमेश झिरपे
Wednesday, 29 August 2018

ट्रेकिंग साहित्याची विक्री 
ट्रेकिंगला जाण्यासाठी अनेक उपकरणांची गरज भासते. साध्या ट्रेकला जायचे असेल तरी उत्तम बूट आणि हवामानाला अनुसरून कपडे असणे आवश्‍यक असते, आणि जर हिमालयातील उंचीवरील ट्रेक करायचे असेल तर मग गरम कपडे, सामान वाहून नेण्यासाठी योग्य बॅग्स अशा एक ना अनेक साहित्यांची गरज भासते. गिर्यारोहणाचा अनुभव असलेली व्यक्ती कोणते साहित्य कधी घ्यावे याबद्दल सर्वयोग्य मार्गदर्शन करू शकते. त्यामुळे असे साहित्याची विक्री करणारे दालन अथवा ऑनलाइन पोर्टल जर गिर्यारोहकाने सुरू केले तर आपल्या क्षेत्राशी निगडित उत्तम करियर त्याला करता येऊ शकते. 

धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गामध्ये भटकणे, धाडस करणे हे आता नित्याचे झाले आहे. आज कित्येक लोक वेळ मिळाला की ट्रेकिंग किंवा भटकंतीला जातात. दरवर्षी हिमालयात ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा देखील शनिवारी- रविवारी गर्दीने खुलून जातात. थोडक्‍यात, गिर्यारोहण, ट्रेकिंग किंवा भटकंती सारखे साहसी खेळ समाजामध्ये रुजू पाहत आहेत. यातून मिळणाऱ्या रोमांचकारी अनुभवामुळे लोक या साहसी खेळाला आपलंस करत आहेत. सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे, परिणामतः यातून विविध प्रकारच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत, नवीन युगातील तरुण या क्षेत्राकडे करियर म्हणून बघत आहे. या साहसी क्रीडाप्रकारातून उत्तम अर्थार्जन होऊ शकते, अट आहे फक्त शारीरिक आणि मानसिक तंदृस्तीची व योग्य आखणीची. म्हणजे नेमके काय हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर लेखामध्ये तुम्हाला याचे उत्तर नक्की मिळेल. गिर्यारोहण क्षेत्रात नेमक्‍या कोणत्या करियरच्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी जाणून घेऊयात. 

गिर्यारोहण तज्ञ (आउटडोअर एक्‍स्पर्ट) 
शहरातील अनेक खासगी संस्था आपल्या कर्मचाऱ्यांच्या बौद्धिक व शारीरिक तंदृस्तीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. टीम बिल्डिंग उपक्रमांसाठी कर्मचाऱ्यांना डोंगरात, निसर्गात घेऊन जाऊन अनेक अभिनव खेळ खेळतात. निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवतात. असे उपक्रम आयोजित करण्यासाठी तसेच परिपूर्ण प्रशिक्षणासाठी अनेक तज्ञ गिर्यारोहकांची गरज भासते. गिर्यारोहणातील बेसिक व ऍडव्हान्स कोर्स केलेल्या तरुण- तरुणींना आउटडोअर एक्‍स्पर्ट म्हणून काम करता येईल. अशा तज्ञ लोकांना प्रचंड मागणी असते. या क्षेत्रामध्ये तुम्ही अर्धवेळ अथवा पूर्णवेळ काम करू शकता. गिर्यारोहकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारा हा उत्तम पर्याय आहे. 

ट्रेकिंग मार्गदर्शक 
काही लोक गिर्यारोहणाची आखणी स्वतःहून करतात. कसे जायचे, कुठे जायचे इत्यादी. पण एवढे पुरेसे नसते. अवघड श्रेणीत मोडणाऱ्या गिर्यारोहण परिसरामध्ये प्रत्यक्ष अनुभव असलेली व्यक्ती सोबत घेऊन जाण्यावर लोक प्राधान्य देतात. यासाठी कसलेला आणि अनुभवी गिर्यारोहक असला की, ट्रेकिंग करताना वाट चुकणे किंवा अपघात होणे असे प्रसंग क्वचितच उद्भवतात. मोठ्या ट्रेकला जाण्यासाठी आवश्‍यक असलेला सराव करून घेण्यासाठी देखील ट्रेकिंग मार्गदर्शकाला लोक प्राधान्य देतात. यातून उत्तम अर्थार्जन होते. 

ट्रेकिंग संस्था 
हौस म्हणून ट्रेक करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. ट्रेकिंगमध्ये मिळणारा आनंद लोकांना या खेळाकडे आकर्षित करत आहे. मात्र, ट्रेकिंगला कुठे जावे, कसे जावे व कधी जावे, ट्रेकिंगसाठी काय पूर्व तयारी करावी, आपल्या शारीरिक क्षमतेला अनुसरून कोणता ट्रेक योग्य या बद्दल लोकांना माहीत नसते. तसेच ट्रेकिंगला जाण्याची पहिलीच वेळ असेल तर एखाद्या जाणत्या ग्रुपसोबत जाण्यास लोक प्राधान्य देतात. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे ट्रेकिंग कंपनी. गिर्यारोहणाचा उत्तम अनुभव असणाऱ्या गिर्यारोहकाने ट्रेकिंग कंपनी काढली तर त्यातून खूप उत्तम प्रकारे अर्थार्जन करता येते. सह्याद्री, हिमालयात सोप्यापासून अति अवघड प्रकारामध्ये मोडणारे असंख्य ट्रेक्‍स आहेत, अनेक लोक हे ट्रेक्‍स करण्यासाठी धडपडत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करणारी संस्था गिर्यारोहकाने सुरू केली, तर त्याचे उत्तम करियर घडेल. 

ट्रेकिंग साहित्याची विक्री 
ट्रेकिंगला जाण्यासाठी अनेक उपकरणांची गरज भासते. साध्या ट्रेकला जायचे असेल तरी उत्तम बूट आणि हवामानाला अनुसरून कपडे असणे आवश्‍यक असते, आणि जर हिमालयातील उंचीवरील ट्रेक करायचे असेल तर मग गरम कपडे, सामान वाहून नेण्यासाठी योग्य बॅग्स अशा एक ना अनेक साहित्यांची गरज भासते. गिर्यारोहणाचा अनुभव असलेली व्यक्ती कोणते साहित्य कधी घ्यावे याबद्दल सर्वयोग्य मार्गदर्शन करू शकते. त्यामुळे असे साहित्याची विक्री करणारे दालन अथवा ऑनलाइन पोर्टल जर गिर्यारोहकाने सुरू केले तर आपल्या क्षेत्राशी निगडित उत्तम करियर त्याला करता येऊ शकते. 

बोल्डरींग प्रशिक्षक 
प्रस्तरारोहण हा गिर्यारोहणाचा अविभाज्य भाग. सह्याद्रीच्या काळ्या दगडावर प्रस्तरारोहण अक्षरशः फुलले. महाराष्ट्रामध्ये अनेक पारंगत प्रस्तरारोहक उपलब्ध आहेत. या सर्वांना रोजगार म्हणून खूप मोठी संधी चालून आली आहे. निसर्गात होणाऱ्या प्रस्तरारोहणावर आधारित कृत्रिम प्रस्तरारोहण अर्थात बोल्डरींग हा नवीन खेळ जनसामान्यात रुजू पाहतो आहे. अनेक शाळांमधून आणि व्यायामशाळेत (जिममध्ये) बोल्डरींगच्या भिंती (कृत्रिम भिंती) उभारण्यात आल्या आहेत. शाळेमध्ये या खेळाचा समावेश करण्याची दोन प्रमुख करणे आहेत. एक म्हणजे शारीरिक तंदृस्ती लाभते, निर्णय क्षमता प्रबळ होते व मुले साहसी बनतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे 2020 साली टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये या खेळाचा समावेश करण्यात आला आहे व भारतातील शालेय विद्यार्थी या खेळामध्ये प्रवीण आहेत. त्यांना अधिक उत्तम खेळाडू बनविण्यासाठी कसलेल्या प्रस्तरारोहकांना प्रचंड मागणी आहे. 

प्रेरणादायी वक्ता 
तुम्ही जर उत्तम ट्रेकर असाल व तुमची सादरीकरण कला उत्तम असेल तर तुम्हाला या दोहोंचा उपयोग करून उत्तम अर्थप्राप्ती करता येईल. गिर्यारोहण करताना घडलेले प्रसंग तुम्ही भाषणातून, लिखाणातून, पुस्तकाच्या माध्यमातून मांडू शकता. तसेच गिर्यारोहण संदर्भातील व्हीडीओ देखील बनवू शकता. अनेक ठिकाणी वक्ते म्हणून जाऊ शकता. प्रेरणादायी अनुभव व विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक गिर्यारोहकांना अनेक आमंत्रणे येतात. तुम्ही तुमच्या कौशल्यांचा योग्य उपयोग केल्यास या क्षेत्रात तुम्हाला उत्तम करियर घडविता येईल. 

आपत्कालीन मदतकार्य 
अपघात, दुर्घटना घडल्यास आपत्कालीन मदतकार्य करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची निकड मोठ्या प्रमाणावर भासते. परदेशामध्ये "रेस्क्‍युअर'ला उत्तम भविष्य आहे. प्रशिक्षित "रेस्क्‍युअर' यांचे अर्थार्जन उत्तम असते. याच धर्तीवर, भारतामध्ये प्रशिक्षित "रेस्क्‍युअर' बनल्यास फार उज्ज्वल भविष्य आहे. "रेस्क्‍युअर' बनण्यासाठी उत्तम शारीरिक व मानसिक तंदृस्ती, प्रसंगावधान व चपळ निर्णय घेण्याची क्षमता आवश्‍यक असते. हे सर्व गुण एखाद्या कसलेल्या गिर्यारोहकामध्ये नक्की असतात. म्हणून एक चांगला गिर्यारोहक एक चांगला "रेस्क्‍युअर' नक्की बनू शकतो. या व अशा अनेक संधी गिर्यारोहण क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. गरज आहे फक्त शोधण्याची. 

(लेखक पुणेस्थित "गिरीप्रेमी' संस्थेचे वरिष्ठ सदस्य आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या कांचनगंगा इको इक्‍स्पेडीशनचे ते "लिडर' आहेत. त्यांच्या संपर्काचा तपशील : इ-मेल umzirpe@gmail.com मोबाईल 9890620490) 


​ ​

संबंधित बातम्या