INDvsSA : ज्याला संघातून डावलंल त्यांनेच करुन दाखवलं!

मुकुंद पोतदार
Saturday, 12 October 2019

उमेशची वाटचाल सोपी नाही. त्याला ग्लॅमर नाही. बोलींग ऑल राऊंडरचा पर्याय तो देऊ शकत नाही. अस्सल वेगवान मारा हेच त्याचे एकमेव भांडवल-बलस्थान आहे.

भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी फलंदाजांना जेवढी चुरस करावी लागते त्या तुलनेत वेगवान गोलंदाजांबाबत तेवढे पर्याय नसायचे. आता हे चित्र बदलते आहे आणि जे दस्तुरखुद्द कपिल देव यांनासुद्धा आश्चर्याचे वाटते. वर्ल्ड कपदरम्यान भुवनेश्वर कुमार याच्याऐवजी महंमद शमीला संधी मिळाली, ज्यावरून बरीच चर्चा झाली. शमीने संधीचे सोने केले.
आता याच वर्षात कसोटी क्रिकेटच्या बाबतीत पण हे घडले आहे.

भारतातील खेळपट्ट्या बोअरींग; हा तर धडधडीत आरोप करतोय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी जसप्रीत बुमरा याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे उमेश यादवला संधी मिळाली, पण पहिल्या कसोटीत त्याला प्रतिक्षा करावी लागली. विखाशापट्टणमला हनुमा विहारीचा समावेश करून फलंदाजी भक्कम करण्यात आली होती. पुण्यातील खेळपट्टीवर थोडे गवत असल्यामुळे तसेच दुसऱ्या कसोटीच्या आसपास जोरदार पाऊस पडल्यामुळे उमेशला निवडण्यात आले.

कसोटीच्या पूर्वसंध्येस कर्णधार विराट आणि पहिल्या दिवसाच्या खेळानंतर चेतेश्वर पुजारा या दोघांनी उमेशच्या निवडीचे समर्थन केले. मायदेशात खेळताना अतिरीक्त गोलंदाज म्हणून स्पीनर ऐवजी फास्टरला प्राधान्य देण्याचा प्रयोग-धाडस टीम इंडिया करेल असे काही वर्षांपूर्वी कुणाला वाटले नसेल, पण वेगवान गोलंदाजांचे विपुल पर्याय त्यास चालना देत आहेत.

विराटने मायदेशात आर. अश्विन-रविंद्र जडेजा ही फिरकी दुकली पुरेशी ठरू शकते असे भाष्य केले होते. पुजाराने पाच गोलंदाज घेण्याबाबत हेच सांगितले. त्यावेळी त्याने उमेशचा खास उल्लेख केला. उमेशची वाटचाल सोपी नाही. त्याला ग्लॅमर नाही. बोलींग ऑल राऊंडरचा पर्याय तो देऊ शकत नाही. अस्सल वेगवान मारा हेच त्याचे एकमेव भांडवल-बलस्थान आहे.

Image

विराटने सगळ्यांना सगळे आले पाहिजे असे सांगताना प्रामुख्याने शेपटाकडून धावांची अपेक्षा बाळगली होती. अशावेळी उमेशसारख्या खेळाडूच्या संधींबाबत मर्यादा निर्माण होतात आणि यापुढेही होतील. हे चित्र प्रामुख्याने झटपट क्रिकेटला लागू होणारे असले तरी कसोटी क्रिकेटमध्येही त्याचा अवलंब आज-ना-उद्या होईलच. फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजाला वर्ल्ड कपमध्ये आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात पसंती मिळण्याचे हेच कारण होते.

संघातून हाकलंल होतं तरी शेवटी ब्रेक थ्यू त्यानंच मिळवून दिला ना!

कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांना विशिष्ट कामगिरी पार पाडावी लागते. उमेशवर ती जबाबदारी होती. त्याने ती थाटात पार पाडली. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने ऐडन मार्करमला शुन्यावर बाद केले. त्यानंतर त्याने डीन एल्गरचा त्रिफळा उडविला. मग तिसऱ्या दिवशी सुरवातीला शमीने विकेट मिळविल्यानतंर उमेशनेही आपला वाटा उचलला. या कामगिरीद्वारे उमेशने आपल्या गुणवत्ता-क्षमता पुन्हा एकदा सादर केल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या