यूएफा नेशन्स लीग : स्पेनने इंग्लंडला आणले जमिनीवर 

वृत्तसंस्था
Sunday, 9 September 2018

लंडन : स्पेनने सुरवातीच्या पिछाडीनंतर विश्‍वकरंडकात चमकदार कामगिरी केलेल्या इंग्लंडला पराजित केले आणि यूएफा नेशन्स लीग फुटबॉलमध्ये विजयी सलामी दिली. दरम्यान, स्वित्झर्लंडने आईसलॅंडला जमिनीवर आणताना अर्धा डझन गोल केले. 

लंडन : स्पेनने सुरवातीच्या पिछाडीनंतर विश्‍वकरंडकात चमकदार कामगिरी केलेल्या इंग्लंडला पराजित केले आणि यूएफा नेशन्स लीग फुटबॉलमध्ये विजयी सलामी दिली. दरम्यान, स्वित्झर्लंडने आईसलॅंडला जमिनीवर आणताना अर्धा डझन गोल केले. 

आठ आठवड्यांपूर्वी इंग्लंडला विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत क्रोएशियाविरुद्ध हार पत्करावी लागली होती, तरीही चाहते खूश होते; पण त्यांना रशियाविरुद्ध पराजित झालेल्या स्पेनने जमिनीवर आणले. मार्कस रॅडफोर्डच्या गोलमुळे इंग्लंडने अकराव्या मिनिटास आघाडी घेतली. या गोलचा जल्लोष जवळपास 81 हजार चाहते करीत असतानाच सॉल निगुएझने स्पेनला बरोबरी साधून दिली आणि रॉड्रिगोने 32 व्या मिनिटास गोल करीत स्पेनचा विजय साकारला. 

उत्तरार्धात स्पेनच्या आक्रमणापेक्षा इंग्लंडविरुद्धच्या प्रतिकूल निर्णयाची चर्चा झाली. लेफ्ट बॅक ल्युक शॉ याच्या डोक्‍याला दुखापत झाली;तर भरपाई वेळेत इंग्लंडचा गोल नाकारण्यात आला आणि त्यांनी वेम्बले स्टेडियमवर 23 लढतींनंतर हार पत्करली. इंग्लंड मार्गदर्शक गेरेथ साऊथगेट यांनी स्पेनचा पासिंग गेम रोखण्यात अपयश आल्याची कबुली दिली. 

पूर्वार्धात दोन आणि उत्तरार्धात चार गोल करीत स्वित्झर्लंडने अर्धा डझन गोल केले आणि आईसलॅंड मार्गदर्शक एरिक हॅमरेन यांना पहिल्याच लढतीत हार पत्करावी लागली. स्विस आक्रमणाचा धडाका पाहून इंग्लंडचेही सरावाच्या लढतीपूर्वी धाबे दणाणले असेल. 

अन्य निकाल ः "ब' विभाग- बोस्निया हेर्झागोविना वि. वि. उत्तर आयर्लंड 2-1. "क' विभाग ः फिनलंड वि. वि. हंगेरी 1-0. ग्रीस वि. वि. एस्टोनिया 1-0. "ड' विभाग ः बेलारुस वि. वि. सॅन मरिनो 5-0. लक्‍झेंबर्ग वि. वि. मोल्दोवा 4-0. 

वेल्स-डेन्मार्क लढतीत विमानाचा व्यत्यय 
वेल्स संघ प्रयाण करणारे विमान कार्डीफ विमानतळावरून उड्डाणच करू शकले नाही, त्यामुळे त्यांची डेन्मार्कविरुद्धची लढत अनिश्‍चित झाली आहे. हा संघ स्थानिक वेळेनुसार दुपारपर्यंत डेन्मार्कमध्ये दाखल झालेला नाही. संघासाठी मागवलेले चार्टर्ड प्लेनही भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता कार्डीफहून रवाना होण्याची शक्‍यता आहे. मात्र या विमानाला लढतीच्या ठिकाणापासून नजीक असलेल्या ऍरहास विमानतळावर लॅंड होणे अवघड जाईल. या परिस्थितीत संघास कोपनहेगन ते लढतीच्या ठिकाणाचा 200 मैलाचा बस प्रवास करावा लागेल. आता लढतीसाठी दाखल होण्याची योग्य काळजी न घेतल्याबद्दल वेल्स संघाला दंड होण्याची शक्‍यता आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या