पराभवानंतरही भारतीय संघाची शान उंचावली 

वृत्तसंस्था
Friday, 11 January 2019

मुंबई/अबुधाबी : काही वर्षांपूर्वी भारतीय फुटबॉल संघ अमिरातीविरुद्ध 0-2 पराजित झाला असता तर चांगल्या लढतीचे समाधान असते. आता संघच नव्हे तर पाठीराखेही या निकालाने हळहळत आहेत. आपण जिंकू शकलो असतो, पण...हीच सर्वांची भावना आहे. 

मुंबई/अबुधाबी : काही वर्षांपूर्वी भारतीय फुटबॉल संघ अमिरातीविरुद्ध 0-2 पराजित झाला असता तर चांगल्या लढतीचे समाधान असते. आता संघच नव्हे तर पाठीराखेही या निकालाने हळहळत आहेत. आपण जिंकू शकलो असतो, पण...हीच सर्वांची भावना आहे. 

भारतीय मार्गदर्शक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या सामन्यानंतरच्या या मताशी सर्वच सहमत असतील. भारतीय फुटबॉल संघाने दीर्घ कालावधीनंतर परदेशातील लढतीत सुरुवातीपासून हुकमत राखली असेल. लढत जिंकली असली तरी नशिबाची साथ लाभल्यामुळेच यशस्वी ठरल्याची जाणीव अमिरातीस होती. भारतीयांच्या जोरदार आक्रमक खेळाने अमिराती हादरले. त्यामुळे यजमानांकडून चुका झाल्या. एकावेळी भारताचे पाच खेळाडू अमिरातीच्या बचाव क्षेत्रात चेंडूवर ताबा घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत होते. अमिराती खेळाडू तंत्रात वरचढ दिसत होते, पण अथक प्रयत्न करीत भारतीयांनी त्यांना जेरीस आणले. भारतीयांचा चेंडू दोनदा गोलपोस्टवर लागून परत आला. नशिबाची साथ लाभली असती, तर कदाचित वेगळाच निकाल दिसला असता. गोलक्षेत्रात माफकच सरस खेळ झाला असता तर अमिरातीला कदाचित चाहत्यांच्या रोशास सामोरे जावे लागले असते. पूर्वार्धात भारताची एकतर्फी हुकमत दिसत होती, तरीही गोल झाला, हीच बाब अमिरातीसाठी निर्णायक ठरली. 

नशिबाची साथ असती, तर दोन किंवा तीन गोल झाले असते, या गोलरक्षक गुरप्रीतच्या मताशी सर्वच सहमत होते. चेंडू बारला, पोस्टला लागण्याच्या घटना फुटबॉलचा भागच आहेत, पण तीन-चार वेळा असे घडते, त्या वेळी नक्कीच नशिबाची साथ हवी असे वाटते, असे तो म्हणाला. या स्पर्धेत गमावलेले तीन गोल नक्कीच सलत आहेत, अशी कबुली त्याने दिली. 

आमचा संघ पराजित संघ नाही. त्यांनी आपली उच्च क्षमता दाखवली आहे. अमिरातीस भारताच्या खेळाने हादरवले होते. हा संघ तरुण आहे. त्याची प्रगतीच होणार आहे. आम्हाला गोलच्या चार संधी होत्या, तर अमिरातीने दोन माफक संधीचे गोलात रुपांतर केले. 
- स्टीफन कॉन्स्टंटाईन, भारतीय मार्गदर्शक 

चुरशीच्या सामन्यात संधीचे गोलात रुपांतर केले असते तर नक्कीच वेगळे घडले असते. आम्हाला बाद फेरीची अजूनही संधी आहे. आम्ही बहारीनविरुद्ध लढण्यास तयार आहोत. 
- सुनील छेत्री, भारतीय कर्णधार 
 


​ ​

संबंधित बातम्या