मुंबईचे प्रयत्न अखेर बंगालविरुद्ध तोकडे

संजय घारपुरे
Thursday, 17 October 2019

- बंगालने सुरुवातीच्या वर्चस्वानंतर तणावपूर्ण झालेल्या लढतीत यू मुम्बाचा 37-35 असा पाडाव केला

- दुसऱ्या उपांत्य सामन्यात दबंग दिल्लीने बंगलूर बुल्सचे आव्हान 44-38 असे संपुष्टात आणले

अहमदाबाद -  सामन्यातील शेवटच्या चढाईत बंगालने आपला बचाव दडपणाखालीही सरस ठरतो, हे दाखवून दिले. अर्जुन देशवालची अखेरच्या चढाईत पकड करीत बंगालने सुरुवातीच्या वर्चस्वानंतर तणावपूर्ण झालेल्या लढतीत यू मुम्बाचा 37-35 असा पाडाव केला आणि प्रो कबड्डीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुणतक्‍त्यात अव्वल आलेल्या दिल्ली आणि बंगाल यांच्यातच आता अंतिम फेरीची लढत होईल. दबंग दिल्लीने नवीन कुमारच्या खेळाच्या जोरावर बंगळूर बुल्सचे आव्हान 38-44 असे परतवून लावले. 
सामन्यातील दहा मिनिटे असताना बंगालने दहा गुणांची आघाडी घेतली होती; पण अजिंक्‍य कापरेने एकाच चढाईत चौघांना टिपत मुंबईच्या आव्हानात जान ओतली; पण त्यानंतरही त्याच्याऐवजी अर्जुन देशवाल आणि अभिषेक सिंग यांनाच आक्रमणाची संधी देण्याची चाल मुंबईला काहीशी भोवली. अभिषेकची सहा आणि अर्जुनची चार वेळा बंगालने पकड केली त्याच वेळी अजिंक्‍यची चार चढाईत एकदाही पकड झाली नव्हती. मात्र मुंबईने त्याला चढाईपासून दूर ठेवले. त्याच वेळी बंगालने दडपणाखाली संयमी खेळ करीत बाजी मारली. 
बंगालचा बचाव भेदण्यासाठी अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवाल हे क्षेपणास्त्र सोडण्याची यू मुम्बाची चाल काहीशी अपयशीच ठरली. विश्रांतीपूर्वी स्वीकाराव्या लागलेल्या लोणमुळे मुंबई 12-18 मागे पडले होते. त्यानंतर यशस्वी- अपयशी चढायांची मालिका सुरू होती; पण त्याच वेळी सुकेश हेगडने मध्य रेषेजवळ त्याची पकड करण्याचा फझल अत्राचली आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न अपयशी ठरवताना एकाच चढाईत चार गुण घेतले आणि काही वेळातच बंगालने दुसरा लोण देत 30-20 आघाडी घेतली. त्या वेळी दहा मिनिटे शिल्लक होती. आता बंगालवर जबाबदारी प्रतिस्पर्धी संघास एकाच चढाईत जास्त गुण मिळणार नाही याची होती. मुंबई आक्रमणाचे अस्त्र असलेल्या अभिषेक आणि अजिंक्‍यला कोर्टबाहेर ठेवण्यात यश मिळवले. 
बंगालचे एकतर्फी वर्चस्व राहणार, असे वाटत असतानाच अजिंक्‍य कापरेने एकाच चढाईत चार गुण घेत मुंबईला बंगालवर पहिला लोण देण्यात मदत केली. मुंबईची पिछाडी 25-33 वरून 31-33 अशी आवाक्‍यातील झाली. सामन्यातील अखेरची चढाई शिल्लक असताना मुंबई एका गुणाने मागे होते. या चढाईची जबाबदारी अर्जुनकडे सोपवण्यात आली. त्याने खेळाडूस बाद करीत टर्न करत असताना बलदेवने पकड केली आणि मुंबईच्या बरोबरीच्या आशाही संपल्या. त्यापूर्वी अभिषेक सिंगला जीवा सिंगने टिपत बंगालला आघाडीवर नेले होते. 

पराभवानंतर पवनचे तुफान 
उपांत्य फेरीतील दिल्ली दबंगविरुद्धच्या 38-44 पराभवानंतर बंगळूर बुल्सचा कर्णधार पवन शेरावतने सहकारी बचावपटूंवर टीका केली. आमच्या बचावपटूंनी काहीही प्रयत्न केले नाहीत. एखाददुसऱ्या सुपर टॅकलने काही साधत नाही. बचावफळी गुणच घेत नसेल, तर लढत कशी जिंकणार? माझी पकड झाल्यावर काही मिनिटांत ऑल आउट होत असेल, तर लढत जिंकणार कशी, अशी विचारणा पवनने केली. पवनने 20 चढायांत 18 गुण घेतले; पण त्याची सहा वेळा पकड झाली. बचावात गुण जात असले, की त्याचे दडपण आक्रमणावर येते, असे पवनने सांगितले. दरम्यान, दिल्लीचा प्रमुख आक्रमक नवीन कुमारने सुपर टेनची मालिका कायम राखत दिल्लीचा विजय सुकर केला. त्याला चंद्रन रणजीतच्या नऊ गुणांची साथ लाभली; मात्र त्यापेक्षाही दिल्लीने चढाईतील 23-28 ही पीछेहाट पकडीतील 14-6 वर्चस्वाने भरून काढली. तीन लोणनी बंगळूरच्या प्रतिकाराच्या आशाच संपल्या. 
 


​ ​

संबंधित बातम्या