कर्णधार कोहली असो वा रोहित.. मैदानावर धोनीच 'बॉस'..!

वृत्तसंस्था
Saturday, 22 September 2018

दुबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडून वर्ष झाले असले तरी धोनी आजही सामन्यात संघासाठी अनेक निर्णय घेताना दिसतो. आशिया करंडकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही धोनीने रोहितला मार्गदर्शन केल्याचे दिसून आले. 

दुबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडून वर्ष झाले असले तरी धोनी आजही सामन्यात संघासाठी अनेक निर्णय घेताना दिसतो. आशिया करंडकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही धोनीने रोहितला मार्गदर्शन केल्याचे दिसून आले. 

मैदानावर क्षेत्ररचना करणे, गोलंदाजीत बदल करणे, डीआरएस चे निर्णय घेणे, गोलंदाजांना मार्गदर्शन करणे अशा सर्व निर्णयांमध्ये त्याचा मोलाचा सहभाग असतो. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दहाव्या षटकात शाकिब अल हसनने रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर सहज फटकेबाजी केली. शाकिबने ऑफ साईडला पहिला चौकार मारला. पुढील चेंडूसुद्धा डीप स्क्वेअर लेगमधून सीमारेषा पार करुन गेला. त्यानंतर धोनीने जडेजाकडे जाऊन त्याच्याशी चर्चा केली आणि दोघांनी शिखर धवनला मिड विकेटवरुन स्क्वेअर लेगला हलवण्याचा निर्णय घेतला. धोनीने लगेच रोहितकडे जाऊन क्षेत्ररचना बदलण्यास सांगितले. रोहितने लगेच शिखर धवनला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करण्यास सांगितले. 

त्याच्या या निर्णयाचा परिणाम पुढील चेंडूवर लगेच दिसून आला. पुढच्या चेंडूवर शाकिबने पुन्ही तोच फटका मारला मात्र यावेळी चेंडू सरळ धवनच्या हातात गेला आणि शाकिब बाद झाला. 

यासर्व प्रकारानंतर ट्विटरवर चाहत्यांकडून धोनीचे भरभरुन कौतुक करण्यात आले. ''धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी धोनीतील कर्णधार संपलेला नाही'' अशा आशयाचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सामन्यात भारताने बांगलदेशला सात गडी राखून पराभूत केले. 

तसेच या सामन्यात धोनीने आशिया करंडकात यष्टींमागे सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला. त्याने 21 डावांमध्ये 38 फलंदाजांना बाद केले आहे. या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा दुसऱ्या तर पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोईन खान तिसऱ्या स्थानावर आहे. संगकाराने 36 फलंदाजांना तर मोईनने 17 फलंदाजांना यष्टींमागे बाद केले आहे.  

संबंधित बातम्या