आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 May 2019

एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खूप कौतुक आहे. या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो.'' 
- मनीषा वर्मा (प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग)

नागपूर : प्रबळ इच्छा, आत्मविश्‍वास अन्‌ कठोर मेहनतीच्या जोरावर राज्यातील आश्रमशाळांमधील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी आज पहाटे एव्हरेस्टरवर तिरंगा फडकवला. आदिवासी विकास विभागाच्या "मिशन शौर्य' मोहिमेअंतर्गत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावतीचा मुन्ना धिकार, चंद्रपूरचा सूरज आडे, अंतुबाई कोटनाके व नाशिक, बीड, धुळे व पालघरमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

जगावेगळे ध्येय उराशी बाळगत स्वतःची ओळख निर्माण करावी या उद्देशाने विभागातर्फे गेल्यावर्षी ही मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या मोहिमेत पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करत जगाचे लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्या पर्वात नऊ विद्यार्थ्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. खादीमल (जि. अमरावती) येथील मुन्ना धिकारने शुक्रवारी (ता. 24) पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी, आसापूर (ता. जिवती, जि. चंद्रपूर) येथील अंतुबाई कोटनाकेने पहाटे 4 वाजून 20 मिनीटांनी व शासकीय आश्रमशाळा, देवाढा येथील सूरज आडे रा. रूपापेठ (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) याने पहाटे 3 वाजून 35 मिनीटांनी मोहीम यशस्वी केली. 

एव्हरेस्टच्या चढाईपूर्वी साहसाची ओळख करून देण्यासाठी वर्धा येथील ज्ञानभारती कौशल्य विकास केंदात मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. या केंद्रात 203 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून निवडलेल्या 132 विद्यार्थ्यांना हैदराबादमधील भोंगीर येथे रॅपलिंग आणि रॉक क्‍लायबिंगचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात उत्कृष्ट ठरलेल्या 41 विद्यार्थ्यांना दार्जिलिंगमधील हिमालयीन माउंटनरिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून 30 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना ऍडव्हान्स माउंटनरिंग प्रशिक्षणासाठी निवडले. सिक्कीममध्ये हिमालयन सेंटर फॉर ऍडव्हेंचरमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांना लेह येथे बर्फाळ नदीतून चालणे, उणे 35 अंश तापमानात स्वतःचा बचाव करणे याचे प्रशिक्षण दिले गेले. संपूर्ण प्रशिक्षणातून उत्तम कामगिरी बजावणाऱ्या 11 विद्यार्थ्यांची निवड मोहिमेसाठी करण्यात आली होती. 

एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खूप कौतुक आहे. या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो.'' 
- मनीषा वर्मा (प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग)


​ ​

संबंधित बातम्या