मौराच्या हॅट्ट्रिकने एऍक्‍सचा स्वप्नभंग; टॉटेनहॅम अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था
Thursday, 9 May 2019

लुकास मौराच्या हॅट्ट्रिकमुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत 24 तासांत दुसरा धक्कादायक निकाल लागला. टॉटेनहॅम हॉट्‌पॉरने एऍक्‍सची स्वप्नवत वाटचाल खंडित केली. उपांत्य फेरीच्या परतीच्या लढतीत टॉटेनहॅमने 3-2 असा विजय मिळवला.

ऍमस्टरडॅम : लुकास मौराच्या हॅट्ट्रिकमुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत 24 तासांत दुसरा धक्कादायक निकाल लागला. टॉटेनहॅम हॉट्‌पॉरने एऍक्‍सची स्वप्नवत वाटचाल खंडित केली. उपांत्य फेरीच्या परतीच्या लढतीत टॉटेनहॅमने 3-2 असा विजय मिळवला. 3-3 सरासरी परंतु एका अवे गोलमुळे त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. निर्णायक लढतीत त्यांचा सामना इंग्लिश प्रीमियर लीगमधीलच लिव्हरपूलविरुद्ध होणार आहे. 

टॉटेनहॅमने हा विजय मिळवायच्या आदल्या दिवशी लिव्हरपूलने बलाढ्य बार्सिलोनावर 4-0 अशी मात केली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटस्‌ संघाला पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या एऍक्‍सला सर्वाधिक पसंती होती. त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश अनेकांनी गृहित धरला होता, परंतु लुकास मौराने त्यांच्यासाठी होत्याचे नव्हते केले. हॅट्ट्रिकमधील तिसरा गोल भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला झाला. 

एऍक्‍सचा कर्णधार मॅथेज डी लीटने पाचव्याच मिनिटाला हेडरवर गोल केला. त्यानंतर हकिम झेचने 35 व्या मिनिटाला गोल केला तेव्हा एऍक्‍स सरासरीवर 3-0 असे आघाडीवर होते. मध्यांतराची ही परिस्थिती होती त्या वेळी सर्वांनी एऍक्‍सचा विजय जवळपास निश्‍चित केला होता, परंतु मध्यांतरला सामन्याचे चित्र बदलले आणि टॉटेनहॅम चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारा आठवा इंग्लिश क्‍लब ठरला. प्रतिष्ठेच्या अंतिम लढतीचा सामना माद्रिदमध्ये 1 जूनला होणार आहे. 

मौराने 55 व्या मिनिटाला पहिला गोल करून अशक्‍य ते शक्‍य करण्यात सुरुवात केली. चारच मिनिटांनंतर त्याने आणखी एक अप्रितिम गोल करून 2-2 अशी बरोबरी केली, तेव्हा एऍक्‍सच्या पाठीराख्यांमध्ये शंकेची पाल चुकचुकू लागली होती. अखंड वेळेची 90 मिनिटे संपल्यानंतर सहा मिनिटांचा भरपाई वेळ देण्यात आला तेव्हा चुरस अधिकच वाढली होती, परंतु बरोबर सहाव्याच मिनिटाला मौराने कॉर्नरवरून गोल केला आणि आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली. 

आम्ही कधीही विचार करू शकत नाही, असा क्षण फुटबॉलने दिला आहे, असे मत मौराने सामन्यांतर व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी प्रीमियर लीगमध्ये टॉटेनहॅमच्या सामन्यात मौराने गोल केला होता. टॉटेनहॅमने 57 व्या मिनिटापूर्वी चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली होती. निर्णायक सामन्यात त्यांचा बेनफिकाकडून पराभव झाला होता. 

उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात हा धक्कादायक विजय मिळवण्याअगोदर टॉटेनहॅमला प्रीमियर लीगमध्ये सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. यातील एक पराभव एऍक्‍सकडू उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील होता. 

फुटबॉल जेवढा आनंददायी आहे तेवढा निर्दयीसुद्धा होऊ शकतो. आम्ही हे आज अनुभवले आहे. 
एरिक टेन हेग, एऍक्‍सचे मार्गदर्शक

संबंधित बातम्या