EngvsPak : तिसऱ्या व अखेरच्या कसोटीत पावसाने राखली पाकिस्तानची लाज

टीम ई-सकाळ
Tuesday, 25 August 2020

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांपैकी शेवटचा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता असून, पावसाच्या आगमनामुळे पाकिस्तान संघाचा पराभव टळला असल्याचे काहीसे चित्र या सामन्यात पाहायला मिळाले आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात साउथहॅम्पटनच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा आजचा दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांपैकी शेवटचा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता असून, पावसाच्या आगमनामुळे पाकिस्तान संघाचा पराभव टळला असल्याचे काहीसे चित्र या सामन्यात पाहायला मिळाले आहे. आणि हा सामना अनिर्णित राहिल्यास तीन सामन्यांची ही मालिका इंग्लंड सहजरित्या आपल्या खिशात घालणार आहे. कोरोनाच्या काळानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरवात झाली होती. आणि वेस्ट इंडीजसोबतच्या मालिकेत देखील इंग्लंडने विजय मिळवला होता.     

रोहित शर्माने पत्नी रितिकासह सुरु केला वर्कआऊट   

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने पहिला फलंदाजी करताना, 8 गड्यांच्या बदल्यात 583 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. इंग्लंडच्या जॅक क्रॉली आणि बटलर यांनी मिळून केलेल्या 359 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला 583 धावांचा डोंगर उभा करणे शक्य झाले. यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघातील आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मोहम्मद रिझवानच्या (53) धावांच्या साथीने अझर अलीने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अझर अलीने 272 चेंडूत 21 चौकाराच्या मदतीने 141 धावांची नाबाद खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. व पाकिस्तानचा संघ 273 धावांत सर्वबाद झाल्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघाला इंग्लंडविरूद्ध फॉलोऑन खेळावे लागले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ या सामन्यात चांगलाच संकटात सापडला आहे. चौथ्या दिवशीचा म्हणजे कालच्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 2 बाद 100 धावा केल्या होत्या. सलामीवीर अबिद अली 42 आणि शान मसूद 18 धावांवर बाद झाले होते. तर कर्णधार अझहर अली 29 व बाबर आझम 4 धावांवर खेळत आहेत. मात्र पावसाच्या आगमनामुळे शेवटचा म्हणजे आजचा पूर्ण दिवस वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला इंग्लंडचे चाहते पाऊस थांबण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

या सामन्यात तिसऱ्या दिवशीच्या खेळात पाकिस्तानचा पहिला डाव 273 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने त्यांना फॉलोऑन दिला होता. त्यामुळे 310 धावांची पिछाडी भरुन काढून सामना आपल्या बाजूने वळवणे किंवा अनिर्णित ठेवणे पाकिस्तानी संघासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. मात्र चौथ्या दिवशीचा देखील काही वेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे, इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी पाचव्या दिवशीच्या खेळात पाकिस्तानच्या उर्वरित आठ फलंदाजांना लवकर बाद करावे लागणार होआहे. परंतु पावसामुळे पाचव्या दिवशीचा खेळच रद्द करावा लागल्यास हा तिसरा आणि अखेरचा सामना ड्रॉ होणार आहे. 

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण 

दरम्यान, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 ऑगस्ट रोजी मँचेस्टर येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेत पहिला सामना जिंकला होता. पाकिस्तानला या कसोटीत मजबूत स्थितीतून देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर साऊथॅम्प्टनच्या एजस रोझ बाऊल येथील दुसरा कसोटी सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे इंग्लंडने यापूर्वीच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1 - 0 ने आघाडी मिळवली आहे.


​ ​

संबंधित बातम्या