या सात जणांचा आता शेवटचा 'वर्ल्ड कप'

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

पुढीलवर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू निवृत्त होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : पुढीलवर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू निवृत्त होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचाही समावेश आहे.

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला यानिमित्ताने सहाव्यांदा विश्वकरंडक जिंकण्याची संधी आहे. तर, यजमान इंग्लंडचा सध्याचा फॉर्म पाहता विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून इंग्लंडकडे पाहण्यात येत आहे. भारतीय संघाची कामगिरीही दमदार होत आहे. या संघांसह काही प्रमख संघांमधील अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज खेळाडू अखेरचा विश्वकरंडक खेळतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

या विश्वकरंडकानंतर हे सात क्रिकेटपटू निवृत्त होण्याची शक्यता आहे:

महेंद्रसिंह धोनी : भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या 37 वर्षीय महेंद्रसिंह धोनीचा हा अखेरचा विश्वकरंडक असण्याची दाट शक्यता आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली यष्टीरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असेल हे निश्चित आहे. धोनीने भारताला आतापर्यंत ट्वेंटी-20 (2007), एकदिवसीय (2011) स्पर्धांचे विश्वकरंडक जिंकून दिलेले आहेत. आता इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वकरंडकातही त्याच्याकडून भारतीय संघाला खूप अपेक्षा आहेत. धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. नुकतेच त्याने 300 एकदिवसीय सामने खेळण्याचाही विक्रम केला असून, त्याच्या नावावर 10 हजारांहून अधिक धावा आहेत. धोनीच्या फलंदाजीवरून सध्याच्या काळात सतत त्याच्यावर टीका करण्यात येत आहे, त्यामुळे त्याचा हा विश्वकरंडक अखेरचा विश्वकरंडक असण्याची दाट शक्यता आहे.

फाफ डू प्लेसिस : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस इंग्लंडमधील विश्वकरंडकानंतर निवृत्त होणार हे जवळपास निश्चित आहे. विश्वकरंडकात आतापर्यंत एकदाही अंतिम फेरीत पोहचू न शकलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ तीनवेळा उपांत्य फेरीत पराभूत झालेला आहे. त्यामुळे चोकर्स अशी त्यांची ओळख आहे. फाफला आपल्या नेतृत्वाखाली कारकिर्दीतील अखेरच्या विश्वकरंडक स्पर्धेत विश्वकरंडक जिंकून देण्याची संधी आहे. एबी डिव्हिलर्स याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेला खेळावे लागणार आहे.

ख्रिस गेल : वेस्ट इंडीजचा स्फोटक सलामीवीर अशी ओळख असलेला ख्रिस गेल निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. गेलने आतापर्यंत 284 एकदिवसीय सामन्यांत 9727 धावा केलेल्या आहेत. विश्वकरंडकामध्ये द्विशतक झळकाविणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. आता त्याला इंग्लंडमध्ये आपल्या संघाला विश्वकरंडक जिंकून देण्याची संधी आहे.

इम्रान ताहिर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळी घेतल्यानंतर अनोख्या पद्धतीने आनंद साजरा करणारा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरची ओळख आहे. त्याने 85 एकदिवसीय सामन्यांत 139 बळी घेतलेले आहेत. इंग्लंडमधील खेळपट्ट्या जलदगती गोलंदाजांना मदत करणाऱ्या असल्या तरी इम्रान आपल्या फिरकीवर फलंदाजाला गुंडाळू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यालाही अखेरच्या विश्वकरंडकात दक्षिण आफ्रिकेला विश्वकरंडक मिळवून देण्याची संधी असणार आहे.

शोएब मलिक : पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक याचीही 2019 च्या विश्वकरंडकानंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानसाठी सर्वांत अनुभवी खेळाडू म्हणून तो संघात असणार आहे. त्याने 266 एकदिवसीय सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 1999 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सध्या तो 36 वर्षांचा आहे.

हाशिम आमला : तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमलाचाही हा शेवटचा विश्वकरंडक असणार आहे. आमलाने आतापर्यंत खेळलेल्या 169 सामन्यांत 7696 धावा केल्या आहेत. त्याची कसोटी क्रिकेटमधीलही कामगिरी जबरदस्त आहे. 36 वर्षीय आमला या विश्वकरंडकानंतर निवृत्ती घेण्याची दाट शक्यता आहे.

रॉस टेलर : 34 वर्षीय न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रॉस टेलर आपला अखेरचा विश्वकरंडक खेळणार हे जवळपास निश्चित आहे. त्याने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी 85 कसोटी, 204 एकदिवसीय आणि 81 ट्वेंटी-20 सामने खेळलेले आहेत. त्याने 2006 मध्ये पदार्पण केलेल्या टेलर हा विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या वाढदिवसादिवशी शतक करणाऱ्या जगभरातील चार खेळाडूंपैकी एक आहे. त्याने 2011 च्या विश्वकरंडकात ही कामगिरी केली होती.


​ ​

संबंधित बातम्या