'साई'कडून सहकार्य मिळत नाही : मनोजकुमार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 February 2019

 भारताचा आघाडीचा बॉक्‍सिंग खेळाडू मनोज कुमार याने क्रीडा प्राधिकरणाकडून (साई) आपल्याला दुखापतीच्या कालावधीत कसलेही सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. 

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा बॉक्‍सिंग खेळाडू मनोज कुमार याने क्रीडा प्राधिकरणाकडून (साई) आपल्याला दुखापतीच्या कालावधीत कसलेही सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धे दरम्यान आपल्याला दुखापत झाली होती. त्या वेळी उपचारासाठी झालेला खर्च मिळण्यासाठी आपण "साई'कडे विनंती केली होती. मात्र, त्यांनी माझ्या विनंतीकडे ठुंकूनही पाहिले नाही. उलट माझ्यावर दुखापत लपविल्याचा ठपका ठेवला, असे मनोज कुमार याने क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या विनंतीचे प्रत्येक वेळी "साई'च्या संबधित अधिकाऱ्यांनीन राजकारण केले. एक क्रीडा मंत्री म्हणून आपण याची चौकशी करावी आणि मला तातडीने योग्य ती वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी अशी विनंती त्याने क्रीडा मंत्र्यांना केली आहे. 
आशियाई क्रीडा स्पर्धेपासून मनोज कुमार बॉक्‍सिंगच्या रिंगपासून दूर आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय शिबिरासाठी देखील त्याची निवड करण्यात आलेली नाही. उपचारासाठी आपल्याला आतापर्यंत 5 लाख 30 हजार 400 रुपये खर्चए आल्याचे मनोजकुमारने संबंधित पदाधिकाऱ्यांना कळविले आहे. सर्व आवश्‍यक त्या पुरावे आणि अहवालासह आपण उपचारासाठी आलेल्या खर्चाची रक्कम "साई' आणि "टॉप' योजनेला कळविली होती. पण, पत्र सोडा माज्या कुठल्याही "ई-मेल'ला त्यांनी उत्तर दिलेले नाही, असे मनोजचे म्हणणे आहे. 

'साई'च्या अधिकाऱ्यांनी मात्र त्याचा आरोप खोडून काढला आहे. मनोजला आम्ही योग्य ती आर्थिक मदत केली आहे. पण, तो आपल्या दुखापतीविषयी शंभर टक्के प्रामाणिक नाही. त्याने सातत्याने आमच्यापासून दुखापतीचे नेमके स्वरुप दडवून ठेवले, असे 'साई'च्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
मनोज हा वरिष्ठ खेळाडू आहे. जेव्हा त्याचा "टॉप्स' योजनेत समावेश होता, तेव्हा त्याला पूर्ण सहकार्य करण्यात आले. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्याचा सर्व खर्च सरकारच्या वतीने करण्यात आला. पण, जेव्हा "टॉप्स'मधून त्याला वगळण्यात आले तेव्हा आम्ही त्याला मदत करण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र, एकवेळ आम्ही त्याचा "टॉप्स'मध्ये समावेश नसतानाही आम्ही त्याला त्याच्या विषयी असलेल्या आदरामुळे मदत केली असे देखील "साई'ने स्पष्ट केले. 

मनोजने सातत्याने दुखापत लपविल्याचा आरोप "साई'ने कायम ठेवला असून, त्याला यावर्षी स्वतःच्या खर्चाने किंवा तो सेवेत असलेल्या रेल्वे मार्फत सरावात दाखल होण्यास सांगितले होते. मात्र, त्यानेच साफ नकार दिला असे देखील "साई'च्या अधिकाऱ्याने सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या