थायलंड रॅलीत संजय संयुक्त तिसरा

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने थायलंड प्री-रॅली मालिकेच्या दुसऱ्या फेरीत गटात संयुक्त तिसरे, तर एकूण क्रमवारीत चौथे स्थान मिळविले. मुसळधार पावसामुळे निसरडा झालेला मार्ग; तसेच क्‍लचमध्ये बिघाड होऊनही संजयने ही कामगिरी नोंदविली. 

पुणे : पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने थायलंड प्री-रॅली मालिकेच्या दुसऱ्या फेरीत गटात संयुक्त तिसरे, तर एकूण क्रमवारीत चौथे स्थान मिळविले. मुसळधार पावसामुळे निसरडा झालेला मार्ग; तसेच क्‍लचमध्ये बिघाड होऊनही संजयने ही कामगिरी नोंदविली. 

लोपबुरीमध्ये ही रॅली पार पडली. संजयने थायलंडच्या डेलो स्पोर्टसने सुसज्ज केलेली इसुझू डीमॅक्‍स कार चालविली. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हिगेटर होता. संजय आणि थायलंडचा ड्रायव्हर अम्नुआय यांची एकूण वेळ 33 मिनिटे 28 सेकंद अशी समान वेळ झाली. 

सात स्टेजेसच्या रॅलीत पहिल्या आणि सहाव्या स्टेजचा अपवाद वगळता इतर सर्व स्टेजेसमध्ये संजयची वेळ सरस होती; पण एफआयए (फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऍटोमोबाईल) नियमानुसार (क्रमांक 54.3) पहिल्या स्टेजमधील वेळेचा निकष लावण्यात येतो. त्यानुसार संजयची वेळ 4 मिनिटे 44 सेकंद, तर अम्नुआयची 4.35 सेकंद होती. संजयने दुसऱ्या स्टेजमध्ये 4.02-4.01, चौथ्यात 3.52-3.56, पाचव्यात 3.39-3.42, सातव्यात 3.38-3.50, तर आठव्यात 3.40-3.32 अशी सरस वेळ नोंदविली होती. सहाव्या स्टेजमध्ये त्याची 10.02, तर अम्नुआयची 9.43 सेकंद अशी वेळ होती. 

संजयने सांगितले, की गुरुवारी थायलंडमध्ये दाखल झाल्यानंतर मला दोन दिवस कारच्या तांत्रिक तयारीत घालवावे लागले. त्यानंतरही क्‍लचचे सेटिंग मनासारखे झाले नव्हते. पावसामुळे मार्गात खड्डे झाले होते. त्यामुळे मला सावध सुरवात करावी लागली. पहिल्या स्टेजमधील सावध ड्रायव्हिंगमुळे मी थोडा मागे पडलो. नंतर पावसामुळे तिसरी आणि नववी स्टेज रद्द झाली. पावसात टोयोटा आणि मित्सुबिशी अशा कमी वजनाच्या कार सरस ठरल्या. माझी कार चार दरवाजांची, तर इतर कार दोन दरवाजांच्या होत्या. इतर कार बॅलन्सिंग करण्यात तुलनेने सोप्या होत्या.

पहिल्या सर्व्हिसला आम्ही क्‍लचप्लेट्‌स बदलून घेऊ शकलो नाही. त्यामुळे मला जास्त वेग वाढवून चालणार नव्हते. अशावेळी गिअर बदलताना कार इंजिनवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी लागली. सरळ मार्ग असल्यावर वेग वाढविणे आणि वळणांच्यावेळी क्‍लच न वापरणे असे माझे धोरण होते. हा अनुभव वेगळाच ठरला. 
ही रॅली थायलंडच्या अत्तुयातने जिंकली. संजयचा सहकारी विचावत दुसरा आला. संजयला चौथ्या क्रमांकाचे गुण मिळाले. या रॅलीत भारताचे चिबोरलांग वाहलांग-अश्विन नाईक सहभागी झाले होते. 33.58 सेकंद वेळेसह ही जोडी पाचवी आली. 


​ ​

संबंधित बातम्या