WTA 250 Phillip Island Trophy : डब्ल्यूटीए स्पर्धेत अंकिता प्रथमच विजेती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021

जागतिक क्रमवारीत प्रथमच अव्‍वल शंभर खेळाडूत प्रवेश
 

मुंबई : अंकिता रैनाने प्रथमच डब्ल्यूटीए स्पर्धेतील विजेतेपद जिंकले. भारतातील अव्वल महिला टेनिसपटू अंकिताने रशियाच्या कॅमिला रॅखिमोवा हिच्या साथीत मेलबर्नमधील फिलिप आईसलॅंड स्पर्धेच्या महिला दुहेरीत बाजी मारली. या यशामुळे तिने जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूत स्थान मिळवले. हा पराक्रम करणारी ती सानिया मिर्झानंतरची पहिलीच भारतीय ठरली आहे. 

ऑस्ट्रेलियन टेनिससाठी लकी लूजर ठरल्यामुळे मेलबर्नमध्ये आल्यानंतर अंकिताची कामगिरी उंचावत आहे. तिचे ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न दुहेरीची लढत खेळल्याने साकारले. डब्ल्यूटीए स्पर्धेत एकेरीची लढत जिंकली आणि आता दुहेरीचे विजेतेपद जिंकले. अंकिता - कॅमिलाने ॲना ब्लिंकोवा - ॲनास्तासिया पोतापोवा यांचा 2-6, 6-4, 10-7 असा पराभव केला. अंकिता - कॅमिलाच्या प्रतिस्पर्धी त्यांच्यापेक्षा सरस मानांकित होत्या, तरीही त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे सध्या जागतिक क्रमवारीत 115 वी असलेली अंकिता आता 94 स्थानावर जाण्याची शक्‍यता आहे. या विजेतेपदामुळे अंकिता - कॅमिलाने आठ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर जिंकताना प्रत्येकी 280 मानांकन गुणांची कमाई केली. 

Australian Open womens doubles 2021 : आर्यना-एलिसे दुहेरीत विजेत्या

अंकिता - कॅमिलाने उपांत्य फेरीप्रमाणेच अंतिम फेरीतही पहिला सेट गमावल्यावर विजय मिळवला. अंकिताने डब्ल्यूटीए २५० मालिकेत प्रथमच विजेतेपद जिंकले. यापूर्वी अंकिता आणि कामरान कौर थांडी यांनी २०१८ मध्ये तैवानमध्ये झालेल्या ओईसी ओपन करंडक स्पर्धेत बाजी मारली होती. या स्पर्धेत आमची कामगिरी खूपच चांगली झाली. आम्ही दोघी प्रथमच एकमेकींच्या साथीत खेळलो. स्पर्धेचा ड्रॉ तयार होण्यापूर्वी २० मिनिटे हा निर्णय घेतला होता. कॅमिला कमालीची आक्रमक आहे. तिला मी नेटजवळच आक्रमक खेळण्याची सूचना केली. या स्पर्धेतील आव्हान सोपे नव्हते. एकेरीत अव्वल पन्नासमध्ये असलेल्या खेळाडू दुहेरीत होत्या, असे  अंकिताने सांगितले. 

अंतिम सामन्यात पहिला सेट गमावल्यावर अंकिता आणि कॅमिलाची सर्व्हिस उंचावली. त्यांनी जास्त ब्रेक पॉईंट जिंकण्यात यश मिळवले. टायब्रेकरवर त्यांनी मोक्‍याच्या वेळी गुण जिंकत बाजी मारली. अंकिताने गतवर्षी पाच स्पर्धा जिंकल्या होत्या, त्यात तीन दुहेरीतील विजेतेपदे होती. 

 
 


​ ​

संबंधित बातम्या