...तर जबाबदारी स्वीकारणार का? टेनिसपटू मेदवेदेवचा संतप्त सवाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 July 2021

द्वितीय मानांकित डॅनिल मेदवेदेव ऑलिंपिक पुरुष टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व लढतीत असह्या उकाडा आणि दमट हवामानात गुदमरल्यासारखा झालेला असताना त्याला पुढे खेळू शकतोस का, अशी विचारणा चेअर अंपायरने केली, यावेळी भडकलेल्या रशियन टेनिसपटूने, मी सामना संपवू शकतो, त्याचवेळी मी मरू शकतो, मी मेलो तर जबाबदारी स्वीकारणार का, अशी संतप्त विचारणा केली.

टोकियो - द्वितीय मानांकित डॅनिल मेदवेदेव ऑलिंपिक पुरुष टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व लढतीत असह्या उकाडा आणि दमट हवामानात गुदमरल्यासारखा झालेला असताना त्याला पुढे खेळू शकतोस का, अशी विचारणा चेअर अंपायरने केली, यावेळी भडकलेल्या रशियन टेनिसपटूने, मी सामना संपवू शकतो, त्याचवेळी मी मरू शकतो, मी मेलो तर जबाबदारी स्वीकारणार का, अशी संतप्त विचारणा केली.

टोकियोतील उष्ण आणि दमट हवामानात सारेच क्रीडापटू होरपळत आहे. टेनिसपटू मेदवेदेव याने बुधवारी इटलीच्या फाबियो फोग्निनी याच्याविरुद्धच्या लढतीच्या कालावधीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सर्व्ह करण्यापूर्वी तो थकून वाकत होता. गुण मिळविल्यानंतर हातातील रॅकेटवर अंग टाकून विश्रांती घेत होता. सामन्याच्या कालावधीत त्याला दोन वेळा वैद्यकीय विश्रांती घ्यावी लागली, तर एकवेळ ट्रेनरला बोलवावे लागले, तरीही अखेरीस मेदवेदेवने सामना पूर्ण केला. फोग्निनी याला ६-२, ३-६, ६-२ असे तीन सेटमध्ये नमवून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळविली.

मेदवेदेव, तसेच अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचसह इतर खेळाडूंनी ऑलिंपिक स्पर्धेतील टेनिस सामने संध्याकाळी खेळवावेत, अशी विनंती करूनही त्याकडे आयोजक डोळेझाक का करत आहेत, याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. बुधवारच्या सामन्यातील मेदवेदेवची स्थिती पाहता, त्याला सावरण्यासाठी काही वेळ लागेल, हे निश्चित आहे. एकदिवस अगोदर थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्यानंतर तापमान ३१ अंश सेल्सियसपर्यंत गेले, उष्णाता ३७ अंश सेल्सियस असल्यासारखी भासत होती. 

सामन्यातील पहिल्या सेटमध्ये ५-२ असा आघाडीवर असताना मेदवेदेवला ओटीपोटीच्या समस्येवर वैद्यकीय उपचार घ्यावे लागले, नंतर दुसऱ्या सेटमध्ये ४-३ असा पिछाडीवर असताना त्याने पुन्हा वैद्यकीय विश्रांती घेतली. मेदवेदेवच्या वेदना स्पष्टपणे जाणवत असताना फोग्निनी याने आक्षेपही नोंदविला. दुसऱ्या व तिसऱ्या सेटच्या दरम्यान अतिरिक्त उष्णतासंबंधित नियमाचा आधार घेत दोन्ही खेळाडूंना दहा मिनिटे कोर्ट सोडण्यास अनुमती देण्यात आली. तिसऱ्या सेटमध्ये ५-२ असा आघाडीवर असताना मेदवेदेवला पुन्हा एकदा वैद्यकीय उपचाराची मदत भासली. यावेळी ट्रेनरने कोर्टवर येत त्याच्या डाव्या हाताला व मांडीला मसाज केला. सामन्यानंतर तिरस्काराने फोग्निनी याने कोर्टवर रॅकेट भिरकावून मारले. त्यानंतर स्वतःच रॅकेट उचलले आणि कोर्टच्या बाजूस असलेल्या कचरा टोपलीत टाकले. 

नववधूची आगेकूच 
महिलांच्या टेनिसमध्ये युक्रेनची चौथी मानांकित एलिना स्वितोलिना हिने इटलीच्या कामिला जॉर्जी हिला ६-४, ६-४ असे नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लग्नानंतर प्रथमच मोठ्या स्पर्धेत खेळताना स्वितोलिना हिने आगेकूच राखली आहे. १६ जुलैला ती फ्रेंच टेनिसपटू गेल माँफिल्स याच्याशी विवाहबद्ध झाली आणि लगेच दाम्पत्य टोकियोस रवाना झाले. त्यांनी हनिमून टेनिस मोसमअखेरीस नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकला आहे. सामन्याच्या वेळेस कोर्टच्या बाजूस बसलेला माँफिल्स पत्नीला प्रोत्साहन देत होता. तो ऑलिंपिक टेनिसमधून अगोदरच बाहेर गेलेला आहे. एकेरी, तसेच दुहेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या