French Open 2020 : 19 वर्षांच्या पोरीची कमाल, ऐतिहासिक कामगिरीसह जेतेपदावर कोरलं नाव

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 10 October 2020

या विजयासह जागतिक क्रमवारीत ती 17 व्या स्थानावर पोहचली आहे.  

पॅरिस : पोलंडची बिगर मानांकित इगा स्तिआतेक हिने फ्रेंच ओपनमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. महिला एकेरीच्या फायनलमध्ये तिने जागतिक महिला टेनिसच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या सोफिया केनिन हिला 6-4, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. 19 वर्षीय इगानं एकही सेट न गमावता ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 1992 नंतर फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवणारी ती सर्वात युवा महिला खेळाडू ठरली आहे.  

French Open 2020 : नदाल-जोकोविच यांच्यात रंगणार फायनल!

इगाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. तिने  3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर केनिनने सर्विस ब्रेक केली. पण, ती पहिला सेट वाचवू शकली नाही. इगाने पहिला सेट 6-4 असा आपल्या नावे केला. सामन्यादरम्यान केनिन दुखापतीने त्रस्त दिसली. पहिला सेट झाल्यानंतर केनिनने ब्रेक कालावधीत दुखापतीवर उपचार घेतल्याचे पाहायला मिळाले.  

हा विजय महिला टेनिसमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारा आहे, असे केनिन विरुद्धचा सामना जिंकत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर इगाने म्हटले आहे. या विजयासह जागतिक क्रमवारीत ती 17 व्या स्थानावर पोहचली आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या