गतविजेती मरिनची ऑलिंपिकमधील माघार पी. व्ही. सिंधूच्या पथ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिना मरीनला गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे, त्यामुळे सिंधूचे ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या वाटचालीतील प्रमुख अडथळा दूर झाला आहे.

माद्रिद - ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिना मरीनला गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे, त्यामुळे सिंधूचे ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या वाटचालीतील प्रमुख अडथळा दूर झाला आहे.

मरीनच्या डाव्या गुडघ्याचा एसीएल दुखावला आहे. त्यामुळे तिच्यावर या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यामुळे ऑलिंपिकला तिला मुकावे लागणार आहे. गेले दोन महिने ही दुखापत सतावत होती. त्याचा पूर्वतयारीवर परिणाम होत होता. त्या वेळी ऑलिंपिकपर्यंत सर्व काही ठीक होईल असा विश्वास वाटत होता, पण गेल्या आठवड्यातील तपासणीत एसीएल दुखावले असल्याचे समजले होते. आता त्याची शस्त्रक्रिया या आठवड्यात होईल, त्यामुळे ऑलिंपिकमध्ये खेळता येणार नाही, असे मरिनने ट्वीटद्वारे जाहीर केले आहे.

मरिनची माघार सिंधूच्या नक्कीच पथ्यावर पडेल. रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूला मरीनविरुद्ध हार पत्करावी लागली होती. मरीनच्या अनुपस्थितीत सिंधूने २०१९ च्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद जिंकले होते. त्या वेळीही मरीनला एसीएलनेच सतावले होते. 

सिंधू वि. मरीन

  • प्रतिस्पर्ध्यातील १५ पैकी ९ लढतीत मरीनची सरशी
  • दोघांतील तीनपैकी दोन अंतिम सामन्यांत मरिन सरस
  • सिंधूचा अंतिम फेरीतील एकमेव विजय इंडिया ओपनमध्ये
  • प्रमुख स्पर्धेच्या बाद फेरीतील १२ पैकी ७ लढतीत मरीनचा विजय
  • २०१० च्या जागतिक कुमारी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा मरीनविरुद्ध विजय, त्यानंतर मालदीव स्पर्धेतही सिंधूची सरशी
  • मरीनने त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन, जागतिक स्पर्धा तसेच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंधूला हरवले

माझी आणि सिंधूची चांगली मैत्री आहे. राफेल नदाल आणि रॉजर फेडरर हे दोघेही सर्वोत्तम टेनिसपटू. त्यांच्यातील लढत चांगलीच कडवी असते, पण ते चांगले मित्र आहेत. माझी आणि सिंधूची मैत्री याच प्रकारची आहे.
- कॅरोलिना मरीन एका मुलाखतीत.


​ ​

संबंधित बातम्या