ऑन्स जॅबेऊरने इगा स्विआतेकचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 July 2021

अरब देशातील महिला टेनिसपटूंचा चेहरा झालेल्या ऑन्स जॅबेऊर हिने माजी फ्रेंच विजेत्या इगा स्विआतेकचा पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दरम्यान, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अॅश्ली बार्तीने प्रथमच या स्पर्धेत अखेरच्या आठ खेळाडूंत स्थान मिळवले.

लंडन - अरब देशातील महिला टेनिसपटूंचा चेहरा झालेल्या ऑन्स जॅबेऊर हिने माजी फ्रेंच विजेत्या इगा स्विआतेकचा पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दरम्यान, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अॅश्ली बार्तीने प्रथमच या स्पर्धेत अखेरच्या आठ खेळाडूंत स्थान मिळवले. 

विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली अरब महिला होताना जॅबेऊरने स्विआतेकचा ५-७, ६-१, ६-१ असा पाडाव केला. आता तिची लढत द्वितीय मानांकित आर्यना सॅबालेंकाविरुद्ध होईल. सॅबालेंकाने १८ व्या मानांकित एलेना रिबॅकिना हिची वाटचाल रोखली. बार्तीने फ्रेंच विजेत्या बार्बोरा क्रॅजसिकोवा हिला ७-५, ६-३ असे पराजित केले. 

ट्युनिशियाच्या जॅबेऊर हिने बर्मिंगहॅम क्लासिक स्पर्धा जिंकून व्यावसायिक महिला टेनिस स्पर्धा जिंकणारी पहिली अरब खेळाडू ठरली होती. हे यश फ्ल्यूक नसल्याचे दाखवताना तिने पाच वेळच्या विजेत्या व्हिनस विल्यम्सला दोन सेटमध्ये हरवले होते आणि त्यानंतर पिछाडीवरून २०१७ च्या विजेत्या गॅर्बिन मुगुरुझाचा पाडाव केला होता. यावेळीही तिने स्विआतेकविरुद्ध पहिला सेट गमावल्यावर खेळ चांगलाच उंचावला. 

जागतिक क्रमवारीत २४ वी असलेल्या जॅबेऊर हिने दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीस सर्व्हिस ब्रेक मिळाल्यावर स्विआतेक स्वतःवर चिडली आणि तिचा खेळ खालावतच गेला. 

बार्ती सफाईदार विजयाने खूष होती. लढत चांगलीच चुरशीची झाली. बार्बोराने या मोसमात चांगला खेळ केला होता. ती प्रतिस्पर्ध्यांचा चांगलाच कस पाहते. स्पर्धेपूर्वीच्या चांगल्या सरावामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचेच प्रतिबिंब स्पर्धेत उमटत आहे, असे बार्तीने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या